पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांच्या दुरूस्तीला वेग; २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविण्यात महापालिकेला यश
उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; नागरिकांनी ‘स्मार्ट सारथी पीसीएमसी’ ॲपवर तक्रार नोंदविण्याचे महापालिकेचे आवाहन


पिंपरी, १७ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):
पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत वेगाने हाती घेण्यात आले आहे. महापालिकेच्या ताज्या अहवालानुसार, शहरातील एकूण २,२४७ खड्ड्यांपैकी तब्बल १,७३३ खड्डे यशस्वीरीत्या बुजविण्यात आले आहेत. सध्या एकूण ७७.१३ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ५१४ खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
-
अ प्रभाग: १४० पैकी १२१ खड्डे बुजवले.
-
ब प्रभाग: १०९ पैकी ८० खड्डे बुजवले.
-
क प्रभाग: १४१ पैकी १२४ खड्डे बुजवले.
-
ड प्रभाग: २३४ पैकी २१५ खड्डे बुजवले.
-
इ प्रभाग: ४५९ पैकी ३३० खड्डे बुजवले.
-
फ प्रभाग: १५१ पैकी १०९ खड्डे बुजवले.
-
ग प्रभाग: २५९ पैकी १७० खड्डे बुजवले.
-
ह प्रभाग: ११८ पैकी ८७ खड्डे बुजवले.
-
ज प्रभाग: ५६ पैकी ५१ खड्डे बुजवले.
-
त प्रभाग: ३३२ पैकी ३०५ खड्डे बुजवले.
याशिवाय, शहरी दळणवळण विभागांतर्गत २४० पैकी १३३, तर स्थापत्य प्रकल्प विभागांतर्गत ९ पैकी ८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उर्वरित खड्ड्यांची दुरुस्तीही तातडीने पूर्ण केली जात आहे.
शहरातील रस्त्यांवर एखादा खड्डा आढळल्यास त्याची माहिती महापालिकेपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी ‘स्मार्ट सारथी पीसीएमसी’ (Smart Sarthi PCMC) ॲपवर विशेष ‘खड्डे नोंदवा’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांना या ॲपचा वापर कसा करावा, याची माहिती देताना प्रशासनाने सांगितले की, खड्डा आढळल्यास त्याचा फोटो, जीपीएसद्वारे (GPS) अचूक ठिकाण, पत्ता आणि खड्ड्याचा अंदाजे आकार ॲपवर नोंदवता येतो. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधितांना एक तक्रार क्रमांक मिळतो, ज्याद्वारे तक्रारीची सद्यस्थिती ऑनलाइन ट्रॅक करता येते. खड्डा दुरुस्त झाल्यानंतर तक्रार बंद करून ती माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते.
“गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ‘स्मार्ट सारथी पीसीएमसी’ ॲप डाउनलोड करून ‘पीसीएमसी सेवा → खड्डे नोंदवा’ हा पर्याय निवडावा. खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा आणि स्मार्ट सारथी ॲपवर तक्रार करा; सुरक्षित व चांगल्या रस्त्यांसाठी महापालिकेच्या या प्रयत्नांना नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे,” असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.




