पिंपरी चिंचवड
वाकड, हिंजवडी आणि पुनावळे परिसरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आयुक्तांकडे निवेदन: श्रुती वाकडकर
अतिरिक्त पोलिस व ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याची मागणी


पिंपरी-चिंचवड, २० ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):
पिंपरी-चिंचवडमधील वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरात दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या वाहतूककोंडीच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आज पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. या भागातील वाढती लोकसंख्या, आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांची रेलचेल आणि राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड वाहतूक यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हिंजवडी आयटी पार्कसह लगतच्या परिसरात सुरू असलेली रस्त्यांची विकासकामे आणि वाढती वाहनसंख्या यामुळे सकाळच्या आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मुख्य चौक आणि मार्गांवर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या कोंडीमुळे चाकरमान्यांचा आणि नागरिकांचा मूल्यवान वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपयय होत आहे. विशेष म्हणजे, या वाहतूककोंडीचा फटका रुग्णवाहिका, शालेय बस व व्हॅन यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही बसत असून, आपत्कालीन परिस्थितीत गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे भागात किमान ३० ते ५० अतिरिक्त पोलीस कर्मचारी तसेच आवश्यक संख्येने ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास प्रमुख जंक्शन, सर्व्हिस रोड, शाळा आणि आयटी परिसरातील वाहतूक अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येणार असून गर्दीच्या वेळेत पर्यायी मार्गांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होण्यास मदत होईल.
या शिष्टमंडळामध्ये नगरसेविका श्रुतीताई वाकडकर, भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष रामभाऊ वाकडकर, सहकारी नगरसेविका रेश्माताई भुजबळ आणि चेतनभाऊ भुजबळ उपस्थित होते. परिसरातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या या गंभीर समस्येचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे, यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांशी सातत्याने पाठपुरावा सुरू असून नागरिकांच्या हितासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




