चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक व पायाभूत सुविधांचा प्रश्न: ‘ॲक्शन प्लॅन’ जाहीर


पिंपरी (लोकजागृती )पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात चाकण औद्योगिक परिसरातील समस्यांबाबत एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. चाकण परिसरातील गंभीर वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पार्किंगचा अभाव, अनधिकृत अतिक्रमणे आणि वीजपुरवठ्यातील समस्यांवर मात करण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधत ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे.
बैठकीतील ठळक मुद्दे व घेतलेले महत्त्वाचे निर्णय: चाकण औद्योगिक परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि बाजूच्या पट्ट्यांची (साईडपट्ट्या) दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. कामात विलंब झाल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
चाकणमधील वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगवर शुक्रवारपासून पूर्ण प्रतिबंध असेल. एमआयडीसी आणि तळेगाव ते भंडारा डोंगर परिसरातील मोकळ्या जागांचा नियोजनबद्ध पार्किंगसाठी वापर केला जाणार असून, नियम मोडणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कठोर कारवाई केली जाईल.
वाहतूक व्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) १०० जवान दोन पाळ्यांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी तैनात केले जातील. तसेच, रस्त्यात वाहने बंद पडल्यास ती त्वरित बाजूला करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था. रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, चहाचे स्टॉल्स, गोदामे आणि इतर अतिक्रमणांची यादी तयार करून २५ ऑगस्टपासून पुढील एक महिन्यात ती हटवली जातील. कोणत्याही राजकीय दबावाशिवाय अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाईल.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सीसीटीव्ही यंत्रणा: ५०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करतानाच भविष्यात AI आणि ट्रॅफिक सिम्युलेशनद्वारे वाहतूक व्यवस्थापन केले जाणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडला जात आहे.पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पदपथ आणि पादचारी क्रॉसिंगची कामे केली जातील. तसेच, अपघातांचा धोका टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत डिव्हायडर कट आणि यू-टर्न बंद केले जातील. औद्योगिक क्षेत्रातील ट्रिपिंग आणि लोडशेडिंगचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर व यंत्रणा उभारण्याचे काम ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल, तर ३१ डिसेंबरपर्यंत ही समस्या पूर्णपणे दूर करण्याचे उद्दिष्ट आहे.
नाशिक फाटा ते पुढील भागासाठी प्रस्तावित सुमारे २८ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, यामुळे भविष्यात वाहतूक सुलभ होणार आहे .
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या या विशेष समितीच्या माध्यमातून चाकण परिसरातील प्रश्न अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन स्वरूपात सोडवले जात असून, ठरवून दिलेल्या कालमर्यादेत याचे प्रत्यक्ष सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.




