चाकणप्रमाणे हिंजवडीचीही अवस्था होऊ देऊ नका!’; शिवसेना (उबाठा) नेते आमदार आदित्य ठाकरे आज हिंजवडी दौऱ्यावर
सकाळी ११:३० वाजता लक्ष्मी चौक व मेट्रो कामाची पाहणी; उद्योजकांच्या समस्या जाणून प्रशासनाला देणार निवेदन


पिंपरी-चिंचवड/पुणे (लोकजागृती न्यूज):
पुण्यातील जगप्रसिद्ध आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव, रखडलेले रस्ते आणि वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरेआज (दि. १८ ऑगस्ट २०२६) हिंजवडीच्या दौऱ्यावर असून, तेथील कंपन्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणार आहेतआज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या (११:३० वाजता) सुमारास आदित्य ठाकरे हिंजवडीतील महत्त्वाच्या अशा लक्ष्मी चौकपरिसराला भेट देणार आहेत. याशिवाय, हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुरू असलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ च्या कामाची आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेची ते पाहणी करणार आहेत. आयटी पार्क परिसरातील चाकरमान्यांना आणि स्थानिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची ते प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेणार आहेत.
यापूर्वी चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांच्या स्थलांतरावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर, आता हिंजवडीतील आयटी कंपन्यांनाही अशाच प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हिंजवडीतील वाहतूककोंडी, खराब रस्ते आणि अपुऱ्या सुविधांमुळे येथील उद्योग इतरत्र जाण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे.
दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे हे हिंजवडीतील विविध आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. कंपन्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्यानंतर ते यासंदर्भातील मागण्यांचे सर्वसमावेशक निवेदन संबंधित प्रशासनाला सादर करणार असून, हजारो तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करणार आहेत.




