बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे तुटलेले कठडे तातडीने दुरुस्त करा; शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांची महापालिका आयुक्तांकडे आक्रमक मागणी
मुसळधार पाऊस व पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याची मागणी

पिंपरी, ६ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):
पिंपरी ते डांगे चौक-चिंचवड मार्गावरील बिर्ला हॉस्पिटलजवळील पुलाचे संरक्षक कठडे नुकत्याच झालेल्या मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे तुटले आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ही बाब गांभीर्याने घेत शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते विश्वजीत श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना तातडीने निवेदन देत पुलाचे कठडे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
आपल्या निवेदनात विश्वजीत बारणे यांनी म्हटले आहे की, या महत्त्वाच्या पुलावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. तसेच मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी या मार्गावरून ये-जा करतात. पुलाचे कठडे तुटल्यामुळे कोणत्याही क्षणी अनर्थ घडून गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण झालेला हा धोका टळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.
संबंधित प्रशासकीय यंत्रणेने या पुलाची त्वरित पाहणी करावी, तुटलेल्या संरक्षक कठड्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि भविष्यात असा धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षाविषयक उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात, अशी ठाम मागणी विश्वजीत बारणे यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न असल्याने महापालिका प्रशासनाकडून यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



