पिंपरी -चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबरची सभा कायदेशीरच:महापौर. रवी लांडगे
माजी महापौर योगेश बहल यांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसला उत्तर


कायदेशीर नोटीसला सविस्तर उत्तर‘ही विशेष सभा नसून माहे सप्टेंबरची नियमित मासिक सभा आहे’; महापालिकेचा दावा
पिंपरी-चिंचवड (लोकजागृती न्यूज):
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आगामी २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली सर्वसाधारण सभा पूर्णपणे वैधरित्या आणि विहित कायदेशीर मार्गाने आयोजित करण्यात आली आहे, असा स्पष्ट खुलासा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसला उत्तर म्हणून महापालिकेने ही प्रेस नोट जाहीर केली आहे.
महापालिकेतर्फे जारी करण्यात आलेल्या खुलाशात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा दाखला देण्यात आला आहे:
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण II मधील नियम १ (अ) नुसार, प्रत्येक महिन्यात महानगरपालिकेची निदान एक तरी सर्वसाधारण सभा भरविण्यात आली पाहिजे आणि ती महिन्याच्या २० तारखेच्या आत भरविण्यात आली पाहिजे, अशी कायदेशीर तरतूद आहे.नियम १ (क) नुसार सभेचा दिवस, वेळ व ठिकाण ठरवण्याचा अधिकार महापौरांना आहे. स्थायी समितीच्या ठराव क्र. १०६२ (दि. २५/०८/२०२६) अन्वये पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे ई.आर.टी.एस. वाहतूक व्यवस्था, पार्किंग धोरण, मेट्रो मार्गिका आणि सार्वजनिक शौचालय हे विषय सप्टेंबर २०२६ च्या महापालिका सभेत घेण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पत्र क्र. महा/कावि/२१८९ अ/२०२६ नुसार नगरसचिवांना दिलेल्या सूचनेनुसार, माहे सप्टेंबर २०२६ रोजीची नियमित महापालिका सभा बुधवार, दि. ०२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर सभा ही कोणतीही ‘विशेष सभा’ नसून सप्टेंबर महिन्याची ‘नियमित मासिक सभा’ आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
३. तहकूब सभेच्या नियमांवर स्पष्टीकरण:
अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण II परिच्छेद १ (म) नुसार तहकूब सभेबाबत नियम स्पष्ट केलेले आहेत. मात्र, एका सभेतील विषय अन्य सभेत घ्यावेत किंवा घेऊ नयेत, याबाबत अधिनियमात कोणतीही प्रतिबंधक तरतूद दिसून येत नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.
उपरोक्त सर्व कायदेशीर तरतुदींचा विचार करता, २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता आयोजित करण्यात आलेली सभा ही पूर्णपणे कायदेशीर असून ती वैधरित्या बोलावण्यात आली आहे, असे महापालिकेने आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.




