बहुचर्चित ‘जयंती २’ चित्रपटाची स्टारकास्ट पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात; विद्यार्थ्यांशी साधणार संवाद


पिंपरी-चिंचवड (लोकजागृती न्यूज):
शहरातील तरुणाईमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या आगामी ‘जयंती २’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाची टीम आज पिंपरी-चिंचवडच्या दौरऱ्यावर आली आहे. चित्रपटाच्या प्रचार आणि प्रसारानिमित्त पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रांगणात आज, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता चित्रपटातील प्रमुख कलाकार उपस्थित राहून तरुण विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत.
युवावर्गात लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाच्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळत आहे. चित्रपटातील प्रमुख कलाकार सकाळी ११ वाजता महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि चित्रपटाच्या प्रवासातील अनुभव शेअर करत आहेत. केवळ चित्रपट प्रमोशन नव्हे, तर आजच्या तरुणाईचे प्रश्न, शिक्षण, सामाजिक जाणिवा आणि चित्रपटाचा मुख्य विषय यावर कलाकार मंडळी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत आहेत.
दिग्दर्शक शैलेश नरवडे यांच्या ‘जयंती’ या पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षक ‘जयंती २’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातील दमदार संवादे, लक्षवेधी टीझर आणि सामाजिक आशय यामुळे तरुणांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.
‘जयंती २’ या आगामी चित्रपटात ऋतुराज वानखेडे,प्रियदर्शनी इंदलकर,पायल जाधव रोहिणी हट्टंगडीआणि देविका दप्तरदार हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.या चित्रपटाचे 11 सप्टेंबर ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सोहळ्यासाठी आणि लाडक्या कलाकारांना भेटण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह परिसरातील चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्टार्सच्या आगमनाने कॉलेज परिसर पूर्णपणे दुमदुमून गेला आहे.




