वडार समाजातील बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षणासाठी समाजाने एकी दाखवावी – विजय चौगुले
भोसरीत ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेतर्फे भव्य संकल्प मेळावा संपन्न; जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापुरात महामेळाव्याची घोषणा


पिंपरी, ३० ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):
वडार समाजात वाढत चाललेली बेरोजगारी, आरोग्याचे प्रश्न आणि शिक्षणातील अनास्था दूर करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. वडार समाज महाराष्ट्रात एनटी प्रवर्गात असला, तरी बाजूच्या कर्नाटक राज्यात तो एससी संवर्गात मोडत असल्याने तिथे अधिक लाभ मिळतात. आगामी जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे होणाऱ्या भव्य महामेळाव्यासाठी लाखो समाजबांधवांनी उपस्थित राहावे, याद्वारे समाजाच्या प्रलंबित मागण्या शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी मोठा लढा उभारला जाईल, असा निर्धार ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी व्यक्त केला.
‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने रविवारी (दि. ३० ऑगस्ट) भोसरीतील क्वालिटी सर्कल फोरम सभागृहात वडार समाज संकल्प मेळावा’ अत्यंत उत्साहात पार पडला. आगामी जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे होणाऱ्या महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित या मेळाव्यात विजय चौगुले यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्यास संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी महापौर हनुमंतराव भोसले, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक राहुल भोसले, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पिंटूभाऊ जाधव, मंत्रालयाचे अवर सचिव राजेश अलकुटे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे स्वीय सहाय्यक यल्लाप्पा गाडीवडर, संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष मोहिते, संपर्कप्रमुख सुधीर पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, सहाय्यक संचालक राजू धोत्रे, भरत विटकर, अमोल धोत्रे, सतीश भोसले, रवी शिंदे, शंकर चौगुले, महिला प्रदेशाध्यक्ष सुनीता जाधव, विजय धोत्रे, श्यामराव विटकर, प्रकाश पवार, युवराज कलगुटकी, संदिपान झोंबाडे, उद्योजक वसंत विटकर यांच्यासह अनेक मान्यवर व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याचे प्रास्ताविक सागर वर्से यांनी केले, सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले, तर आभार प्रदीप पवार यांनी मानले.
विजय चौगुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जातीच्या दाखल्यासाठी असलेली १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून पक्की घरे मिळावीत, ‘बार्टी’ व ‘आर्टी’च्या धर्तीवर ‘शूरवीर हरबा वडार रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ स्थापन करावे आणि वसंतराव नाईक महामंडळाकडून विनाअट कर्ज मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तरुणांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
महापौर रवी लांडगे यांनी मनोगतात सांगितले की, वडार समाजातील विद्यार्थ्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये अभ्यासिका उभी करण्यासाठी महापालिका कटिबद्ध राहील. शिक्षणाला प्रोत्साहन दिल्यासच समाजाची खरी प्रगती होईल.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी, संघर्षावर मात करणाऱ्या या समाजाला ताकद देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत, असे स्पष्ट करत पिंपरी-चिंचवडमध्ये वडार समाजासाठी हवी असलेली जागा उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात वडार समाजासाठी एखादी हक्काची वास्तू (इमारत) उभी राहावी, यासाठी महापालिकेने भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. माजी महापौर **हनुमंतराव भोसले** यांनी तरुणांनी संघटन वाढवण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. याशिवाय मनोहर बंदपट्टे, युवराज कलगुटकी, दिलीप कुसाळकर व विजय धोत्रे यांनीही आपले विचार मांडले.
समाजासाठी उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर हनुमंतराव भोसले, मंत्रालयाचे अवर सचिव मनोहर बंदपट्टे आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मोरे यांना वडार समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.




