वडार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ३० ऑगस्ट रोजी भोसरीत भव्य ‘संकल्प मेळावा’!
‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटना व वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानचे आयोजन; विविध मागण्यांसाठी निर्णायक लढा देण्याचा निर्धार


पिंपरी-चिंचवड (लोकजागृती न्यूज):
वडार समाजाच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे लढा उभारण्याच्या उद्देशाने ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटना आणि ‘वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान’ पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने उद्या, रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता भोसरी येथील क्वालिटी सर्कल फोरम (गणेश नगर शेजारी, टेल्को रोड, एम.आय.डी.सी., भोसरी) येथे भव्य ‘वडार समाज संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापुरात महामेळावा
समाजाच्या विविध मागण्या शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी एक विराट शक्ती उभी करण्याच्या दृष्टीने आगामी जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने भव्य महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून या पुणे जिल्हास्तरीय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजयदादा चौगुले या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी शहराध्यक्ष पिंटूभाऊ जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सांभाळली आहे.
मान्यवरांचा ‘वडार समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान
या संकल्प मेळाव्याचे औचित्य साधून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रतिष्ठित ‘वडार समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर हनुमंतराव अण्णा भोसले, मंत्रालयाचे अवर सचिव मनोहर बंदपट्टे आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलमामा मोरे यांना प्रदान केला जाणार आहे.
या मेळाव्यास ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश अण्णा धोत्रे, प्रदेश सचिव तानाजी पवार, पिंपरी-चिंचवड मनपाचे महापौर रवीभाऊ लांडगे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच नगरसेवक राहुलभाऊ भोसले, सुधीरभाऊ पवार, राजेश अलकुटे, राजू धोत्रे, संतोष मोहिते, यल्लाप्पा गाडीवडर यांच्यासह विविध मान्यवर, महिला आघाडी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यातील प्रमुख मागण्या:
१. दाखल्यांची अट शिथिल करणे: वडार समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करावी.
२. हक्काची पक्की घरे: वसंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व शासकीय विविध योजनांतून समाजातील कुटुंबांना पक्की घरे मिळवून द्यावीत.
३. संस्थेची स्थापना: ‘बार्टी’ व ‘आर्टी’च्या धर्तीवर ‘शूरवीर हरबा वडार रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ (SHRVRTI) या संस्थेची स्थापना करावी.
४. विनाअट कर्जपुरवठा: वसंतराव नायक विमुक्त भटक्या विकास महामंडळाकडून विनाअट कर्ज मिळावे.
५. जमीन वाटप: भूमिहीन कुटुंबांना उपजीविकेसाठी प्रति कुटुंब ५ एकर जमीन शासनाने द्यावी.
६. महिला बचत गटांना प्राधान्य: महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकान देण्याबाबत प्राधान्य दिले जावे.
७. दगड खाण कामगारांचे हक्क: २०० ब्रास रॉयल्टीऐवजी ५०० ब्रास रॉयल्टी माफ करण्यात यावी.
८. बांधकाम आरक्षण: शासकीय व निमशासकीय बांधकाम कामात PWD चे १०% आरक्षण ठेवावे.
वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय प्रगतीसाठी एकत्र येणे ही काळाची गरज असून, या मेळाव्यात जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




