पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रशिक्षण

पुनावळे-ताथवडे येथे महापालिकेची सीबीएससी शाळा उभारावी :श्रुती वाकडकर

जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला श्रुतीताई वाकडकर यांचा विरोध

Spread the love

 

पिंपरी (लोकजागृती )पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य श्रुतीताई वाकडकर यांनी प्रभाग क्रमांक २५ मधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड-पुनावळे-ताथवडे परिसरातील सुमारे ०.९१ हेक्टर (९,१०० चौ.मी.) आरक्षित जागा ३० वर्षांच्या लीज तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी वार्षिक सुमारे ₹७ कोटी भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, ही जागा भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी या भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून येथे महापालिकेची स्वतःची सीबीएससी पॅटर्न शाळा उभारण्यात यावी.

त्या पुढे म्हणाल्या की, “कोणत्याही शहराच्या विकासात शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. Education is the Foundation of Our Future Growth. वाकड येथे महापालिकेने सावित्रीबाई फुले सीबीएससी पॅटर्न शाळा उभारली आहे. त्याच धर्तीवर पुनावळे आणि ताथवडे येथेही महापालिकेची दर्जेदार सीबीएससी शाळा विकसित करावी.”

प्रभाग क्रमांक २५ तसेच आसपासच्या परिसरात हजारो कष्टकरी, नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबे वास्तव्यास असून, आपल्या मुलांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण मिळावे, ही त्यांची अपेक्षा आहे. मात्र वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे सर्वसामान्य पालकांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

प्रशासनाला प्रश्न उपस्थित करताना त्यांनी विचारले की, “जर ही जागा भाडेतत्त्वावर एखाद्या संस्थेला देण्यात येणार असेल, तर महापालिकेची सीबीएससी शाळा उभारण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणार आहात का?”

पुनावळे आणि ताथवडे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत, प्रथम त्या जागेवर महापालिकेची सीबीएससी शाळा उभारावी आणि त्यानंतरच इतर कोणताही निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका मांडत या प्रस्तावाला माझा संपूर्ण विरोध आहे, असे नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य श्रुतीताई वाकडकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button