गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ, स्वच्छता, विद्युत सुरक्षा आणि विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे दिले निर्देश
विविध विभागांच्या कामकाजाचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा


पिंपरी, ३१ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून धोकादायक जोडण्यांवर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने तातडीने कारवाई करावी. कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था वेळेत पूर्ण करावी. तसेच प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, अशा सक्त सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये गणेशोत्सव तसेच शहरातील विविध नागरी सुविधांच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, स्वच्छता व्यवस्था, रस्ते व पदपथांची स्थिती, विद्युत सुरक्षाव्यवस्था, उद्याने, गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी तसेच नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात यावा.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रेरणा सिनकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त सचिन पवार, सीताराम बहुरे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, संदीप खोत, पंकज पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, परशुराम वाघमोडे, गोरक्षनाथ लिम्हण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आदी विभागांचे कार्यकारी अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील कृत्रिम विसर्जन हौदांची आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी. विसर्जनस्थळी स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा आणि नागरिकलॉयी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गणेशोत्सव काळात विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच शहरातील विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून धोकादायक जोडण्यांवर तातडीने कार्यवाही करावी.
आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त ठेवणे ही प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. प्रभागातील फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करावेत. सार्वजनिक स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ ठेवावीत, झाडांची छाटणी करावी आणि रस्ते खड्डेमुक्त व सुस्थितीत ठेवण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावे.
प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर बीट निरीक्षकांमार्फत बारकाईने लक्ष ठेवावे. नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची (पाडकाम) कारवाई करावी. अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन मिळणार नाही याची दक्षता घेऊन, अशा बांधकामांना देण्यात आलेल्या नळजोडण्या तसेच विद्युत पुरवठा खंडीत करण्याबाबत नियमानुसार कठोर कारवाई करा
नागरिकांनी सदनिका किंवा इमारतीमधील मालमत्ता खरेदी करताना संबंधित बांधकाम अधिकृत आहे किंवा नाही, याची पडताळणी करावी. मंजूर बांधकाम आराखडा, आवश्यक परवानग्या आणि महापालिकेच्या संबंधित नोंदी तपासूनच सदनिका खरेदी करावी, याबाबत नागरिकांना जागृत करावे.
महापालिकेच्या ‘सारथी’ प्रणालीवर तसेच शासनाच्या संकेतस्थळांवर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संबंधित विभागप्रमुखांनी तातडीने दखल घेऊन त्यांचा वेळेत निपटारा करावा. तसेच लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होणारी पत्रे, निवेदने आणि तक्रारींवर गांभीर्याने विचार करून वेळेत कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईबाबत त्यांना अवगत करावे.
शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वाचनालये, ग्रंथालये आणि व्यायामशाळांची संख्या वाढविण्याची आवश्यकता असून, क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपलब्ध जागांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार जागा निश्चित कराव्यात, अशा सूचनाही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.




