पिंपरी चिंचवड

फसवणूक प्रकरणातील दिरंगाई निगडी पोलिसांना भोवणार? नामदेवराव जाधवांवर कारवाईसाठी शिवशाही महिला आघाडी आक्रमक

२४ तासांच्या आत कारवाई न झाल्यास तीव्र संघर्षाचा इशारा; उषामाई कांबळे यांचा पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम

Spread the love

पिंपरी, १६ जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या फसवणुकीच्या एका प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ललिता काळे या पीडित महिलेची २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रा. नामदेवराव जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल करूनही कारवाई होत नसल्याने, शिवशाही शासन पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उषामाई कांबळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाची २४ तासांच्या आत दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पीडित ललिता काळे यांनी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीची लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये गंभीर आरोप असूनही, बराच कालावधी उलटूनही पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही किंवा ठोस चौकशी केलेली नाही. पोलिसांच्या या ‘उदासीन’ धोरणामुळे पीडितेच्या न्यायाचा मार्ग लांबणीवर पडला आहे, अशी खंत कांबळे यांनी व्यक्त केली आहे.
उषामाई कांबळे यांनी निगडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीचा दबाव किंवा वशिलेबाजी पोलीस प्रशासनाने खपवून घेऊ नये. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून २४ तासांच्या आत गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी.
या दिरंगाईमुळे समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रकरणाच्या प्रती पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगालाही धाडण्यात आल्या आहेत. जर २४ तासांच्या आत प्रशासनाने कोणतीही कायदेशीर कार्यवाही केली नाही आणि त्याची लेखी माहिती दिली नाही, तर शिवशाही शासन पक्ष महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.
आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि कोणाचा दबाव झुगारून पीडितेला न्याय मिळवून देते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button