मीरा शिंदे यांना “हिंद रत्न कामगार पुरस्कार” प्रदान
श्रमिकांच्या कष्टाने कामगार नगरीचा विकास - महापौर रवी लांडगे


पिंपरी, पुणे (दि. २ सप्टेंबर २०२६) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितले आहे की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.” याप्रमाणे श्रमिकांच्या कष्टाने पिंपरी चिंचवड या औद्योगिक आणि कामगार नगरीचा विकास झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे कामगार नेते इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम आणि त्यांची हिंद कामगार संघटना देशभर कार्यरत आहे. या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी एका कामगाराला हिंद रत्न कामगार पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार प्रथमच एका परिचारिका महिलेला देण्यात येत आहे. हा पुरस्कार म्हणजे सर्व परिचारिकांचा सन्मान व इतरांना प्रेरणादायी आहे. यावर्षीच्या पुरस्कारार्थी नूतन भोसरी रुग्णालयातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या परिचारिका मीरा शिंदे यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी स्वाईन फ्लू आणि कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य पार पाडले. त्यांची निवड सार्थ आहे असे पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.
हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त मीरा शिंदे यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार २०२६’ महापौर लांडगे यांच्या हस्ते पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमात देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, रोख रक्कम होते. यावेळी इंटकचे प्रदेशाध्यक्ष व हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, भारती घाग, निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ मोरे, हाफिज पठान, आनंदराव फडतरे, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, सचिन कदम, उत्तम गायकवाड, सारिका भिंगे आणि कामगार बंधू, भगिनी उपस्थित होते.
डॉ. कैलास कदम यांनी स्वागत प्रास्ताविक करताना सांगितले की, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली कामगार संघटना आहे. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी संजीवा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हिंद कामगार संघटना इंटक संलग्न आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, गुलझारी लाल नंदा, पंडित नेहरू, मौलाना आझाद यांनी इंटकचे नेतृत्व केले आहे. देशात बहुतांशी सरकारी आस्थापनांमध्ये आणि खाजगी कारखान्यांमध्ये कामगारांचे नेतृत्व ही संघटना करते. हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा पुरस्कार हा पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते देत आहोत ते देखील एका कामगार संघटनेचे नेते आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. मीरा शिंदे यांनी आपली नोकरी व कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत एकूण ३१ वर्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २७ वर्ष रुग्णसेवा केली. त्यांचा गौरव करताना आम्हाला अभिमान वाटत आहे असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.
सूत्र संचालन प्रा. गणेश गोरिले आणि आभार यशवंत सुपेकर यांनी मानले.
————————




