आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत सामाजिक न्यायासाठी एल्गार


लातूर, २६ जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):अनुसूचित जातींतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेल्या सामाजिक न्याय, समता आणि समान संधीच्या तत्त्वांच्या संरक्षणासाठी उद्या रविवार, २७ जुलै २०२६ रोजी लातूर येथे एका भव्य ‘विराट जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक मोर्चामध्ये विधानपरिषद सदस्य आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातून हजारो समाजबांधव सहभागी हया मोर्चानिमित्ताने आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय आणि समान संधीचा अधिकार मिळवून दिला आहे. अनुसूचित जातींसाठीचे आरक्षण हा संविधानिक हक्क असून, त्याचा लाभ समाजातील अगदी शेवटच्या आणि प्रत्येक घटकापर्यंत न्याय्य पद्धतीने पोहोचणे गरजेचे आहे. अनुसूचित जातींतील उपवर्गीकरण हे याच सामाजिक न्यायाच्या प्रभावी अंमलबजावणीचे पाऊल आहे.”त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ही मागणी कोणत्याही विशिष्ट समाजाच्या विरोधातील नसून संविधानाच्या चौकटीत राहून सामाजिक न्याय अधिक व्यापक करण्याची आणि दीर्घकाळ वंचित राहिलेल्या घटकांना आरक्षणाचा समान लाभ मिळवून देण्याची आहे.
मोर्चाची वेळ आणि स्थान
वार व दिनांक: रविवार, २७ जुलै २०२६
वेळ: सकाळी १०.०० वाजता
प्रारंभ स्थान: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाईजवळ, लातूर.
समाजबांधवांना एकजुटीचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक विचारांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायाची ही लढाई अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक समाजबांधवाने मोठ्या संख्येने या जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे. या ऐतिहासिक मोर्चातील प्रत्येकाची उपस्थिती या चळवळीला मोठी ताकद देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. लातूर शहर आणि परिसरातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी होऊन सामाजिक न्यायाच्या यालढ्याला बळ द्यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीनेही करण्यात आले आहे.




