डॉ. पी. डी. पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्कार प्रदान; आषाढी एकादशीच्या निमित्ताने राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा दिमाखदार वारकरी मेळावा


पिंपरी, २५ जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने दिंडी व कामगार वारकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख तथा कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांना त्यांच्या चार दशकांहून अधिक काळातील अतुलनीय शैक्षणिक योगदानाबद्दल शिक्षणमहर्षी” या सन्मानाने गौरवण्यात आले.
समाजाचा सर्वोच्च सन्मान – यशवंतभाऊ भोसले
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी प्रास्ताविकात डॉ. पी. डी. पाटील यांच्या चार दशकांच्या शैक्षणिक प्रवासाचा गौरव केला. “हा पुरस्कार कोणत्याही शासनाचा नसून थेट समाजाचा आहे. आजपासून पी. डी. पाटील हे खऱ्या अर्थाने ‘शिक्षणमहर्षी’ आहेत,” अशी घोषणा त्यांनी केली. डी. वाय. पाटील संस्थेमुळे हजारो सर्वसामान्य, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले डॉक्टर, अभियंते आणि आयटी तज्ज्ञ होऊन देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, सोशल मीडियातील पत्रकारांसाठी संस्थेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि आरोग्य सुविधा सुरू करण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.
हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक: डॉ. पी. डी. पाटील सत्काराला उत्तर देताना डॉ. पी. डी. पाटील अत्यंत भावनिक झाले. “मी गेल्या ४५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करत आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा विस्तार करण्याची संधी मला मिळाली. आज जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या संस्थेचा भाग असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. हा पुरस्कार माझ्यासाठी मोठी प्रेरणा असून, याचे सर्व श्रेय माझ्या सहकाऱ्यांना आणि समाजाला जाते,” असेोगोदोद्गार त्यांनी काढले.
पिंपरी -चिंचवडची शैक्षणिक ओळख जगभर पोहोचविण्यात डी. वाय. पाटील संस्थेचे मोलाचे योगदान आहे. सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांनी अनेकांचे आयुष्य घडवले आहे. श्रमिक आणि वारकरी संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणण्याचे कौतुकास्पद काम यशवंतभाऊ भोसले करत आहेत.”
माजी खासदार अमर साबळे:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ या विचाराला प्रत्यक्षात आणत पी. डी. पाटील यांनी शिक्षणाची पंढरी उभी केली आहे. अनेक पिढ्या घडवणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. यशवंतभाऊ भोसले हे निष्काम कर्मयोगाच्या भावनेतून सातत्याने समाजकार्य करत आहेत.”आषाढी एकादशीच्या पवित्र वातावरणात झालेल्या या मेळाव्याला चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमाताई खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह अनेक मान्यवर, वारकरी आणि हजारो श्रमिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन नंदू कदम यांनी पार पाडले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिनेश पाटील, दीपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे, ओंकार देशपांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.




