पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या मेट्रो विस्ताराला गती; भविष्योन्मुख नियोजनासाठी डीपीआरमध्ये सुधारणा करण्याचे महापौर रवि लांडगे यांचे निर्देश

महामेट्रोच्या सादरीकरण बैठकीत खासदार, आमदार आणि शहर प्रमुखांची उपस्थिती; 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी'वर विशेष भर

Spread the love

 

पिंपरी, २७ जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विकास आणि वाढती लोकसंख्या पाहता, मेट्रोचे नियोजन केवळ आजच्या पुरते मर्यादित न राहता पुढील अनेक दशकांचा वेध घेणारे असावे. नागरिकांच्या हिताचा, सर्वसमावेशक आणि भविष्योन्मुख मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालात (DPR) आवश्यक त्या सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश महापौर रवि लांडगे यांनी महामेट्रोला दिले आहेत.

महापौर रवि लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या डीपीआरचे सादरीकरण व उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली.

या महत्त्वपूर्ण बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टीचे खुणाल वाव्हळकर, शहर अभियंता मनोज सेठीया, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महामेट्रो आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .

बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय प्रणालीद्वारे  प्रस्तावित मेट्रो विस्ताराचा सविस्तर अहवाल सादर केला. यामध्ये प्रस्तावित मार्ग, त्यांची आर्थिक व भौगोलिक व्यवहार्यता, प्रवासी क्षमता, भविष्यातील टप्पे, इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी समन्वय तसेच शहराच्या विकास आराखड्याशी सुसंगत असलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती देण्यात आली.

सर्वसमावेशक जाळे: शहरातील नव्याने विकसित होत असलेले निवासी परिसर, औद्योगिक वसाहती, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, व्यापारी केंद्र आणि प्रमुख मार्ग मेट्रो नेटवर्कशी प्रभावीपणे जोडणे.

लास्ट माईल कनेक्टिव्हिटी:नागरिकांना मेट्रो स्थानकांपर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी फीडर बस सेवा, वाहन पार्किंग, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, सुरक्षित पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅक यांचा प्रभावी समावेश करणे.

वाहतूक कोंडी आणि प्रदूषणमुक्ती: या प्रकल्पामुळे शहरातील वाढती वाहतूक कोंडी सुटण्यास, प्रदूषणावर नियंत्रण मिळण्यास आणि औद्योगिक-आयटी क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा सूर बैठकीत उमटला.

भविष्योन्मुख नियोजनावर भर – महापौर रवि लांडगे बैठकीत मार्गदर्शन करताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हे देशातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर आहे. आगामी काळातील लोकसंख्या वृद्धी, आयटी व औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आणि प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मेट्रोचे नियोजन हवे. आजच्या गरजेबरोबरच भविष्यातील अनेक दशकांचा विचार करून तयार होणारे हे नेटवर्क शहराच्या विकासाला नवी दिशा देईल. त्यामुळे डीपीआरमध्ये तातडीने योग्य त्या सुधारणा करून लोकाभिमुख प्रकल्प उभा करावा.”

शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी ऊर्जा देणाऱ्या या मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित डीपीआरमुळे पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button