भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर परिसंवादासह विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम
पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके-विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा होणार


पिंपरी (लोकजागृती )शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ‘भटके-विमुक्त दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भाटनगर, लिंक रोड, पिंपरी येथे विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिसंवाद, आरोग्य शिबिर तसेच भटके-विमुक्त समाजाच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, पार्थ पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, विक्रम काकडे, शंकर मांडेकर यांच्यासह महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘भटक्या-विमुक्त समाजाची दशा आणि दिशा’ या विषयावर परिसंवाद सायंकाळी ५.३० वाजता ‘भटक्या-विमुक्त समाजाची दशा आणि दिशा’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात पद्मश्री गिरीष प्रभुणे, माजी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, कामगार नेते तथा भाट समाज सेवा ट्रस्टचे शहर अध्यक्ष मनोज माछरे, भटक्या-विमुक्त जाती-जमाती सामाजिक आधार संघटनेचे अध्यक्ष हरी सावंत, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य किशोर शिंदे आणि भटके-विमुक्त प्रवर्गाचे अभ्यासक भरत विटकर सहभागी होणार आहेत.
भटके-विमुक्त समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास, त्यांच्या प्रश्नांची सद्यस्थिती तसेच भविष्यातील वाटचाल या विषयांवर परिसंवादातून विचारमंथन करण्यात येणार आहे.
‘भटके-विमुक्त लोकसंस्कृतीचा जागर’ सांस्कृतिक कार्यक्रम.सायंकाळी ७ वाजता निर्मिक आर्टस् मिडिया प्रस्तुत ‘भटके-विमुक्त लोकसंस्कृतीचा जागर’ हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. लोककला, परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा नागरिकांसमोर मांडण्यात येणार आहे.
‘भटके-विमुक्त दिवस’ हा केवळ स्मरणाचा दिवस न राहता समाजाच्या प्रश्नांवर संवाद, जनजागृती आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा ठरावा, या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम स्थळ : भाटनगर, लिंक रोड, पिंपरी, पुणे-१७
दिनांक : सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६
वेळ : सायंकाळी ५.०० वाजता




