वारीत विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा; २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना वैद्यकीय मदत



अमरावती (लोकजागृती न्यूज):आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (डायल १०८) अंतर्गत २७ अत्याधुनिक रुग्णवाहिका २४ तास सेवेत तैनात करण्यात आल्या होत्या. या प्रभावी आरोग्यसेवेमार्फत यंदाच्या वारीत एकूण २,४४५ वारकऱ्यांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, राज्यात ही महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा बीव्हीजी (BVG) द्वारे यशस्वी.
वारकऱ्यांना क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ आरोग्यसेवा मिळावी, यासाठी पंढरपूर येथे विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून पालखी सोहळ्याच्या प्रवासाचे सातत्याने बारकाईने निरीक्षण करण्यात आले आणि आवश्यकतेनुसार तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविण्याचे चोख नियोजन करण्यात आले. या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेट देऊन संपूर्ण सेवा व्यवस्थेची पाहणी केली आणि यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले.वारीदरम्यान मानाच्या दहा पालख्यांसोबत १०८ रुग्णवाहिकांची विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये खालील पालख्यांचा समावेश होता:
* संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर)
* संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
* संत सोपानकाका महाराज (सासवड)
* संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
* संत तुकाराम महाराज (देहू)
* संत नामदेव महाराज (पंढरपूर)
* संत एकनाथ महाराज (पैठण)
* रुक्मिणी माता (कौंडानेपूर, अमरावती)
* संत निळोबाराय (पिंपळनेर, पारनेर)
* संत चांगाटेश्वर महाराज (सासवड)
बीव्हीजीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड** म्हणाले, “पंढरीच्या वारीत विठ्ठुरायाच्या भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे अभाग्य समजतो. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही अल्पावधीत २७ रुग्णवाहिकांचे नियोजन केले. वारकऱ्यांना सुरक्षित व आरोग्यमय वारीचा अनुभव मिळावा, यासाठी आमचे आरोग्यदूत अहोरात्र पूर्ण ९९०२ निष्ठा आणि सेवाभावाने कार्यरत होते.”
**’गुड समरीटन’ ॲप ठरले वरदान**
आषाढी वारीदरम्यान ‘गुड समरीटन’ (Good Samaritan) स्वयंसेवकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आपत्कालीन परिस्थितीची तात्काळ माहिती १०८ नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवली. त्यामुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत झाली.
याबाबत अनुभव सांगताना स्वयंसेवक दयानंद मेंशेके म्हणाले, “वारीपूर्वी शासनामार्फत आयोजित विशेष प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. वारीदरम्यान एक महिला भाविक अचानक बेशुद्ध पडताच मी तात्काळ ‘गुड समरीटन’ ॲपद्वारे माहिती दिली. हे ॲप अत्यंत प्रभावीपणे कार्यरत असल्याने १०८ रुग्णवाहिका अल्पावधीत घटनास्थळी पोहोचली आणि संबंधित महिलेला वेळेत व योग्य उपचार मिळू शकले.”
तंत्रज्ञानाची जोड आणि बीव्हीजीच्या आरोग्यदूतांच्या तत्परतेमुळे यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरली असून, सर्व स्तरातून या सेवेचे कौतुक होत आहे.




