स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पाऊल; कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार नवी गती
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘चार-बिन कचरा विलगीकरण’ मोहिमेला व्यापक वेग; महापालिकेतर्फे शहरात घरोघरी जनजागृती


पिंपरी, (लोकजागृती न्यूज):
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात कचरा विलगीकरणाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने एक व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांना ‘चार-बिन कचरा विलगीकरणा’बाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले जात आहे.
घराघरांमध्ये निर्माण होणारा कचरा हा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने गोळा व्हावा, यासाठी ओला, सुका, सॅनिटरी (आरोग्यविषयक) आणि विशेष काळजी योग्य कचरा असे चार स्वतंत्र प्रकार पाडण्यात आले आहेत. हा चारही प्रकारचा कचरा नागरिकांनी वेगळा ठेवून महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीमध्येच देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा उघड्यावर टाकणे पूर्णपणे टाळावे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता पसरवू नये, याबाबतही पथकांद्वारे नागरिकांचे कसून प्रबोधन केले जात आहे.
“कचरा व्यवस्थापनाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कचऱ्याचे योग्य विलगीकरण हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. घरातूनच कचरा स्वतंत्र केल्यास त्याची पुढील विल्हेवाट, प्रक्रिया आणि शास्त्रीय पुनर्वापर अधिक सुलभ पद्धतीने करणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी चार-बिन पद्धतीचा कटाक्षने अवलंब करून महापालिकेला सहकार्य करावे.” “कचरा विलगीकरणाची सवय आता प्रत्येक कुटुंबात रुजणे काळाची गरज बनली आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधून जनजागृती मोहीम राबवली जात आहे.”
उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल: “गृहभेटींच्या माध्यमातून नागरिकांना चार प्रकारच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन आणि घंटागाडीमध्ये तो कसा द्यावा, हे प्रत्यक्षात समजावून सांगितले जात आहे. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ या भावनेतून नागरिकांनी या मोहिमेत हििरीरीने सहभाग घ्यावा.”
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही मोहीम जोमाने सुरू असून, शहर पूर्णपणे स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी नागरिकांनी कचरा विलगीकरणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




