पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

मोशी कचरा डेपो दुर्घटना: शोधमोहिमेत ६ जणांचे मृतदेह सापडले; दोषींवर कठोर कारवाईची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

Spread the love

पिंपरी, ११ जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):

मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. या शोधमोहिमेत आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रशासनाला बचावकार्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्या म्हणाल्या, “ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. सुरुवातीपासूनच मी प्रशासनाच्या संपर्कात असून एनडीआरएफच्या टीमला तातडीने पाचारण केले होते. ढिगाऱ्यातील विषारी वायू आणि पावसामुळे अडथळे येत असले, तरी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.”

तसेच, बाधितांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना शासन स्तरावर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कंपनी, शासन आणि महानगरपालिका अशा तिन्ही स्तरांतून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी पुढील व्यक्तींना मृत घोषित केले आहे:

१. अक्षय सावंत(वय ३५, रा. मोशी)

२. सुनील कोरके(वय ४०, रा. आळंदी)

३. सन्नी माने (वय ३९, रा. गंधर्वनगरी, मोशी)

४. महेश कुंभार(वय ३३, रा. छत्रपती संभाजीनगर)

५. नागेश गायकवाड(वय २६, रा. संजय गांधी नगर, मोशी)

६. रणजीत पाटील (वय २२, रा. मोशी)

उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, महापौर रवी लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मृतदेह नातेवाईकांना सन्मानपूर्वक दाखवावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

सध्या घटनास्थळी प्रशासनाकडून बचावकार्य सुरूच असून, या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी अहवाल तयार करण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button