निगडीतील भुयारी मार्गाच्या स्वच्छता व सुरक्षेचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला आढावा!
नियमित स्वच्छता, रात्री कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नेमणूक आणि मद्यपींवर कडक कारवाईचे निर्देश


पिंपरी, १९ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):
पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या भुयारी मार्ग (सबवे) परिसरातील स्वच्छता, सुरक्षा आणि अतिक्रमणाच्या वाढत्या प्रश्नांबाबत महापालिकेच्या वतीने गांभीर्याने पावले उचलण्यात आली आहेत. उपमहापौर शर्मिला बाबरयांनी नुकताच या परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून तेथील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुधारणा करण्याचे कडक निर्देश दिले.
पाहणीदरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भुयारी मार्ग आणि त्याच्या आसपासच्या परिसरात नियमितपणे कचरा साफ करणे व स्वच्छता राखणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच, रात्रीच्या वेळी या परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला, नागरिक व विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी तिथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
भुयारी मार्ग परिसरात काही समाजकंटक व मद्यपींकडून मद्यपान केले जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. याची गंभीर दखल घेत उपमहापौरांनी अशा मद्यपींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना व संबंधित विभागाला दिले. याशिवाय, परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या चालण्यात अडथळा निर्माण होत असल्याने अतिक्रमणांवरही योग्य ती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
दौऱ्यादरम्यान उपमहापौर शर्मिला बाबर यांनी परिसरातील स्थानिक व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. व्यापाऱ्यांनी मांडलेल्या अडीअडचणींची दखल घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परस्परांच्या समन्वयाने त्वरित कार्यवाही करावी, जेणेकरून हा परिसर लवकरात लवकर पूर्णपणे स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुरक्षित होईल, असे त्यांनी सांगितले.
या पाहणी व आढावा बैठकीस सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, सुरक्षा निरीक्षक गौरव मोरे तसेच निगडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, राजू चौधरी, शरद रणपिसे रफीक गोलंदाज,सागर सावंत,बाबुराव इंगळे, बाबुराव चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




