पिंपरी चिंचवडशिक्षण

NEET 2026 मध्ये अखिल भारतीय स्तरावर ४९८ वा क्रमांक पटकावणारी पिंपरी-चिंचवडची कन्या अतुल्या डोंगरे हिचा महापौरांच्या हस्ते गौरव

कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा - महापौर रवि लांडगे

Spread the love

पिंपरी, २९ जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):देशभरात अत्यंत अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या NEET 2026 परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराची कन्या कु. अतुल्या डोंगरे हिने अखिल भारतीय स्तरावर ४९८ वा क्रमांक (AIR 498) पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महापौरांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन तिचे अभिनंदन केले आणि तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्पर्धेच्या या युगात कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे अतुल्या डोंगरे हिने सिद्ध करून दाखवले आहे. तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. तिच्या या यशातून शहरातील हजारो विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने अधिक जोमाने वाटचाल करतील, असा विश्वास मला वाटतो.”

विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतेही ध्येय अशक्य नाही, असे सांगत गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी महानगरपालिका नेहमीच उभी राहील, असा शब्द महापौरांनी दिली.

आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि कुटुंबीयांच्या सततच्या पाठिंब्याला देत अतुल्या डोंगरे म्हणाली, “सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यामुळेच हे यश मिळवणे शक्य झाले.” विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहावे, असा मोलाचा संदेशही तिने यावेळी दिला.

कु. अतुल्या डोंगरे हिची जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट कामगिरी ही पिंपरी-चिंचवडमधील आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारी असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button