पिंपरी चिंचवड

काळेवाडी, रहाटणीसह विविध भागांतील खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनाला अल्टीमेटम;

खड्ड्यांत वृक्षारोपण करण्याचा माजी विरोधी पक्षनेत्यांचा इशारा

Spread the love

ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांच्या हाल; रस्त्यांची त्वरित दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

 

पिंपरी,  (लोकजागृती न्यूज):

पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, भारत माता चौक, नढेनगर, कोकणेनगर, पाचपीर चौक, आदर्शनगर आणि ज्योतिबानगर या परिसरातील रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास जीवনघेणा ठरत असून, महापालिका प्रशासनाने हे रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास नागरिकांच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री. मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

सततच्या पावसामुळे या सर्व भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांमधील मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिक खड्ड्यांत पडून गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, शाळकरी विद्यार्थ्यांना ये-जा करताना साचलेल्या पाण्यामुळे व चिखलामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले.

संबंधित प्रभागांमधील रस्त्यांची ही दयनीय अवस्था पाहता, महापालिका आयुक्तांनी तातडीने संबंधितांना योग्य निर्देश देऊन या संपूर्ण भागातील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जर प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेतली नाही, तर होणाऱ्या जनआंदोलनाची आणि कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button