आरोग्यपिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी; दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – भाऊसाहेब भोईर यांची आक्रमक मागणी

Spread the love

पिंपरी, १० जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज)

मोशी कचरा डेपो येथे घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असून, या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी केली आहे.

भाऊसाहेब भोईर हे सध्या पूर्वनियोजित कामानिमित्त राज्याबाहेर असून, या काळात घडलेल्या घटनेमुळे त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. तथापि, शहराबाहेर असूनही त्यांचे लक्ष बचावकार्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “सध्या एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि लष्कराच्या मदतीने सुरू असलेले मदतकार्य युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणे हीच आपली सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. एक-एक क्षण महत्त्वाचा असून, बचाव पथकाने आपली पूर्ण ताकद त्यासाठी पणाला लावावी.”केवळ वरवरची चौकशी करून चालणार नाही, तर या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि संबंधित यंत्रणेवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. “कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. मी शहरात परतताच या घटनेचा वैयक्तिक पातळीवर तपशीलवार आढावा घेणार आहे. जोपर्यंत पीडित कुटुंबांना न्याय आणि योग्य भरपाई मिळत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला .अशा गंभीर प्रसंगी राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी बचाव यंत्रणांना सहकार्य करणे आणि बाधितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे आवाहन त्यांनी केले. भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कचरा डेपोच्या संपूर्ण व्यवस्थापनाची आणि सुरक्षेची नव्याने पुनर्रचना करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे नमूद करत त्यांनी पीडित कुटुंबांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून, त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे कळवले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button