पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘शून्य कचरा पर्व’ अभियानाला दिमाखात प्रारंभ; उपमहापौर शर्मिला बाबर व माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

शून्य कचरा आदर्श शाळा पुरस्कार-२०२६' भोसरीच्या इंग्लिश मीडियम स्कूलला प्रदान; कचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

Spread the love

पिंपरी, १० ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):

स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक, महापौर रवि लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात **‘शून्य कचरा पर्व’** या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभिनव उपक्रमाला अत्यंत उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. आचार्य अत्रे रंगमंदीर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात उपमहापौर शर्मीलाताई बाबरआणि माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा लांडगे यांच्या प्रमुख हस्ते या उपक्रमाचे दीपप्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या विशेष प्रसंगी, मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भोसरी येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राबविण्यात आलेल्या ‘शून्य कचरा शाळा’ उपक्रमात उल्लेखनीय योगदान देणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल शून्य कचरा आदर्श शाळा पुरस्कार-२०२६’इंग्लिश मीडियम स्कूल, भोसरी या शाळेला प्रदान करण्यात आला.

भोसरी येथील या शाळेने शून्य कचरा व्यवस्थापनाचे एक उत्तम आणि आदर्श मॉडेल विकसित केले आहे. यामध्ये शाळेत निर्माण होणाऱ्या ओला, सुका व घातक कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण, प्रत्येक वर्गात स्वतंत्र डस्टबिनची व्यवस्था, कचऱ्याचा पुनर्वापर (Recycling) आणि पुनर्चक्रण यावर विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक वर्गातून एक मुलगा व एक मुलगी यांची शून्य कचरा क्लास मॉनिटर’म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ही या उपक्रमाची प्रमुख खासियत ठरली आहे.

 

* शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची नियमित व दैनंदिन नोंद ठेवणे.

* पुनर्वापरासाठी पाठविण्यात येणाऱ्या कचऱ्याचे अचूक मूल्यमापन करणे.

* दरवर्षी शाळेत ‘शून्य कचरा ऑडिट’ (Zero Waste Audit) करणे.

* एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा (Single-Use Plastic) वापर पूर्णपणे टाळणे.

‘ही कचरा गाडी नाही, तर ही पुनर्वापराची गाडी आहे’ हा अत्यंत पॉझिटिव्ह आणि पर्यावरणाभिमुख संदेश लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात.

हा ‘शून्य कचरा पर्व’ उपक्रम केवळ महानगरपालिकेच्या शाळांपुरता मर्यादित न ठेवता, भविष्यात शहरातील खासगी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, ज्येष्ठ नागरिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच, प्रत्येक शनिवारी शून्य कचरा अभियान राबविणे आणि सर्व विद्यार्थ्यांकडून ‘शून्य कचरा स्वप्रतिज्ञा’ घेण्याचा महत्त्वाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

या कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसेवक विराज लांडे, आसरा सोशल फाउंडेशनच्या अर्चना मोरे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संदेश देताना मान्यवरांनी सांगितले की, शून्य कचरा ही केवळ एक तात्कालिक मोहीम नसून, स्वच्छ, सुंदर, हरित आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठीची आपली प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही जनचळवळ आता प्रत्येक घरापर्यंत आणि पुढे संपूर्ण शहरापर्यंत पोहोचवून एक नवी ‘शून्य कचरा संस्कृती’ आपल्याला रुजवायची आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button