पिंपरी चिंचवड

आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली २० ते २५ हजार समाजबांधवांचा सहभाग; निगडी तहसीलदारांना सुपूर्द केले निवेदन

पिंपरी-चिंचवडमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी भव्य ‘जनआक्रोश महामोर्चा’!

Spread the love

पिंपरी-चिंचवड (लोकजागृती न्यूज):

अनुसूचित जाती (SC) आरक्षणातील उपवर्गीकरण महाराष्ट्रात तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात मातंग, मादीगा, वाल्मिकी, ढोर तसेच इतर संबंधित समाजबांधवांच्या वतीने मंगळवारी एक भव्य ‘जनआक्रोश महामोर्चा’ काढण्यात आला. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, यामध्ये अंदाजे२० ते २५ हजार समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी १२ वाजता या महामोर्चाला सुरुवात झाली. चिंचवड स्टेशनपासून निगडीच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात मार्गावरील विविध ठिकाणांहून समाजबांधव जोडले गेले. हातामध्ये फलक, मागण्यांचे फलक आणि घोषणाबाजी करत समाजबांधवांनी अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आपला तीव्र आक्रोश व्यक्त केला. तब्बल पाच तास चाललेला हा मोर्चा सायंकाळी ५ वाजता निगडी येथील तहसील कार्यालयासमोर पोहोचून संपन्न झाला.

महामोर्चामध्ये मातंग, मादीगा, वाल्मिकी आणि ढोर समाजासह अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर वंचित घटकातील नागरिकांनी सहभाग नोंदवत आरक्षणाचे लाभ तळागाळातील सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावेत, अशी भूमिका मांडली. शिक्षण, रोजगार तसेच राजकीय प्रतिनिधित्वाच्या संधींपासून वंचित राहिलेल्या घटकांना सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार न्याय्य लाभ मिळण्यासाठी उपवर्गीकरणाची प्रक्रिया विनाविलंब सुरू करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकारने महाराष्ट्रातही उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, असा आग्रह धरण्यात आला.

मोर्चाची सांगता झाल्यानंतर एका शिष्टमंडळाने तहसीलदार जयकुमार देशमुख यांची भेट घेऊन अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याबाबतचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले. प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घेऊन शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी विनंती करण्यात आली.

या महामोर्चाला विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि समाजनेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. यामध्ये आमदार सुनीलजी कांबळे, माजी मंत्री दिलीपजी कांबळे, माजी आमदार सुधाकरजी भालेराव, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, नगरसेवक बापू घोलप, नेताजी शिंदे, मारुती जाधव, सचिनजी साठे, विष्णूजी कसबे, संजयजी ठोकळ, राजेशजी घोडे, अजिंक्यजी चांदणे, सुकुमारजी कांबळे, गणपतजी भिसे, रेखा बहरवाल, रावसाहेब डोंगरे, मारुती आण्णा पंदरी, राजेशजी बडगुजर, मारुती वाडेकर, ॲड. राम चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकल मातंग समाज पिंपरी-चिंचवड आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या महामोर्चाने पिंपरी-चिंचवड शहरात उपवर्गीकरणाचा जोरदार आवाज उठवला असून, आता या जनआक्रोशाची राज्य सरकार कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button