पिंपरी चिंचवड

मोशी येथील सिटी प्राईड स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन केंद्रात साहित्य प्रदर्शन व प्रात्यक्षिकांचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अग्निसुरक्षेचे महत्त्व; पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे विशेष जनजागृती अभियान

Spread the love

पिंपरी, ७ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी एका विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत सिटी प्राईड स्कूल, मोशी येथील विद्यार्थ्यांसाठी मोशी अग्निशमन केंद्र येथे अग्निशमन सुरक्षा साहित्य प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेबाबतची जाणीव अधिक दृढ झाली आहे.

कार्यक्रमादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना विभागाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. आग विझवण्यासाठी वापरण्यात येणारी विविध आधुनिक उपकरणे, बचाव कार्य साहित्याची माहिती, अग्निशमन वाहनांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो, याचे जिवंत प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

अचानक आग लागल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, सुरक्षितपणे इमारतीबाहेर कसे पडावे, प्राथमिक उपाययोजना कोणत्या कराव्यात आणि तात्काळ मदतीसाठी अग्निशमन विभागाच्या १०१ या टोल-फ्री किंवा आपत्कालीन क्रमांकावर कसा संपर्क साधावा, याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्सुकतेने सहभाग घेतला. त्यांनी अग्निशमन वाहनांची जवळून पाहणी केली तसेच विविध अग्निशमन साहित्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जवानांनी देऊन शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून सुरक्षेचे धडे गिरवतात.

शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षेची योग्य संस्कृती रुजावी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी धैर्याने व योग्य पद्धतीने प्रतिसाद द्यावा, या उद्देशाने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे अशा प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम यापुढेही शहरात सतत राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button