पिंपरी चिंचवड

वडार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ३० ऑगस्ट रोजी भोसरीत ‘संकल्प मेळावा’!

जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापुरात होणार भव्य महामेळावा; ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेतर्फे तयारीला वेग

Spread the love

 

 

पिंपरी,  (लोकजागृती न्यूज):

वडार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटितपणे एक निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने आगामी जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे एका भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून, रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता क्वालिटी सर्कल फोरम, टेल्को रोड, भोसरीयेथे ‘वडार समाज संकल्प मेळावा’आयोजित करण्यात आला आहे.

या महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी पुणे जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. समाजाच्या समस्यांवर केवळ चर्चा न करता संघटित शक्तीच्या माध्यमातून त्या शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी या मेळाव्यात सामूहिक संकल्प करण्यात येणार आहे. ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

मान्यवरांचा ‘वडार समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान

संकल्प मेळाव्याचे औचित्य साधून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशिष्ट मान्यवरांना ‘वडार समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा हा प्रतिष्ठित पुरस्कार पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर हनुमंतराव भोसले, मंत्रालयातील अवर सचिव मनोहर बंदपट्टे आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मोरे यांना प्रदान केला जाणार आहे.

या संकल्प मेळाव्यास पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच नगरसेवक राहुल भोसले, अपर सचिव राजेश अलकुटे, यल्लाप्पा गाडीवडर, संतोष मोहिते, सुधीर पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, राजू धोत्रे, भरत विटकर, अमोल धोत्रे, सतीश भोसले, रवी शिंदे, शंकर चौगुले, सुनीता जाधव, विजय धोत्रे, श्यामराव विटकर, प्रकाश पवार, वसंत विटकर, युवराज कलगुटकी आणि संदिपान झोंबाडे यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

वडार समाजाच्या हक्कांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या संकल्प मेळाव्यात जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button