ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक व माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील एक दूरदर्शी पर्व संपले

कोल्हापूर / पिंपरी-चिंचवड (लोकजागृती न्यूज):
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक डॉ. दत्तात्रय यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांवर उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने शिक्षण, राजकारण आणि समाजकारणातील एक दूरदर्शी व मार्गदर्शक नेतृत्व हरपले असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांचा प्रवास एका सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सुरू होऊन महापौर, लोकप्रतिनिधी आणि पुढे देशातील महत्त्वाच्या राज्यांचे राज्यपाल अशा उच्च घटनात्मक पदांपर्यंत पोहोचला होता. आपल्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यानंतर त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. लोकसेवा, शिक्षण आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे त्यांना देशभरात विशेष ओळख व सन्मान लाभला.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत देशभरात शाळा, महाविद्यालय आणि उच्च शिक्षण संस्थांचे मोठे जाळे उभारले. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी आणि इतर उच्च शिक्षण शाखांमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमुळे लाखो सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली. केवळ शैक्षणिक संस्थाच नव्हे, तर नवी मुंबईत जागतिक दर्जाचे भव्य क्रीडा संकुल उभारण्यातही त्यांचे मोठे योगदान होते. कृषी आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या या बहुमोल कार्याची दखल घेऊन भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहत, “त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राने एक दीपस्तंभ आणि दूरदर्शी नेतृत्व गमावले आहे,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी असून, त्यांच्या विचारांचा वसा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.




