पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘पार्किंग पॉलिसी’ची प्रभावी अंमलबजावणी होणार – महापौर रवि लांडगे

शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उभारण्याचे निर्देश

Spread the love

 

पिंपरी, ४ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज): पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने ‘पार्किंग पॉलिसी’च्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महापालिकेत एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अधिक सक्षम, व्यवहार्य आणि नागरिकांना दिलासा देणारी पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 या महत्त्वपूर्ण बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह महापालिकेचे संबंधित विभागप्रमुख आणि सल्लागार उपस्थित होते.

 यापूर्वीच्या पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीत आलेल्या अडचणी, त्रुटी आणि त्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले.शहरातील वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या पाहता प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पार्किंग व्यवस्थेचे तातडीने पुनर्नियोजन करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. व्यापारी भाग , सार्वजनिक ठिकाणे आणि प्रमुख चौकांमध्ये शिस्तबद्ध पार्किंग उभे करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आले.बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागांतील पार्किंगची सद्यस्थिती, उपलब्ध जागा आणि भविष्यातील नियोजनाबाबतचे प्रस्ताव व सादरीकरण केले.

बैठकीत मार्गदर्शन करताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या अत्यंत वेगाने वाढते आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध आणि कार्यक्षम बनविण्यासाठी प्रभावी पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी ही आजच्या काळाची गरज आहे. नागरिकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांचा कार्यक्षम वापर करणे आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देणे हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून एक उत्तम आणि नागरिकाभिमुख पार्किंग व्यवस्था उभी करावी.”

शहरातील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या या नव्या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असून, आगामी काळात शहरात प्रभावी पार्किंग धोरणाची अंमलबजावणी पाहायला मिळणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button