पिंपरी चिंचवडआरोग्यमहाराष्ट्र

मोशी कचरा डेपो दुर्घटना: इमारतीखाली अडकलेल्या ८ नागरिकांच्या सुटकेसाठी बचावकार्याला वेग; ढिगारा हटवण्याचे काम सुरू

Spread the love

पिंपरी, १० जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज): पिंपरी येथील मोशी कचरा डेपो परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्याला युद्धपातळीवर वेग आला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अंदाजे ८ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा आढावा घेतला असून, विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याचे निर्देश दिले आहेत.

दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. या ढिगाऱ्यामुळे बचावपथकातील जवानांना इमारतीमध्ये प्रवेश करणे कठीण जात आहे. त्यामुळे, प्रथम इमारतीभोवतालचा मलबा हटवण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), भारतीय सेना, महापालिका व पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन एकत्रितपणे काम करत आहेत.

एनडीआरएफचे सेकंड कमांडंट दीपक तिवारी यांनी माहिती दिली की, इमारत एका बाजूला झुकलेली असल्यामुळे ती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. बचावकार्यात जवानांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने, आधी इमारतीचा अस्थिर भाग सुरक्षितपणे हटवला जात आहे. ढिगारा हटवल्यानंतर जवानांना इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार केला जाईल, त्यानंतरच अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पार पडला.

बचावकार्य अधिक वेगाने पार पाडण्यासाठी ३ जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम काल रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आयुक्तांनी घटनास्थळी तैनात सर्व यंत्रणांना तांत्रिक बाबी आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अचूक नियोजनासह काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

“आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि आवश्यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करून दिली आहे. बचावकार्य आव्हानात्मक असले तरी, सर्व यंत्रणांच्या समन्वयाने आपण लवकरच अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढू,” असा ठाम विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

सध्या घटनास्थळी नागरिक आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण असले, तरी एनडीआरएफ आणि भारतीय सैन्याच्या जवानांच्या उपस्थितीमुळे बचावकार्याला गती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button