पिंपरी चिंचवड

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटींची मदत, कायमस्वरूपी नोकरी व घराची मागणी; मागण्या मान्य न झाल्यास ‘ताला ठोको’ आंदोलनाचा इशारा

Spread the love

 

पिंपरी-चिंचवड (लोकजागृती न्यूज):

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी महापालिका प्रशासन, अधिकारी आणि कंत्राटदारावर गंभीर आरोप करत थेट स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्यावर राजकीय हस्तक्षेपाचा प्रखर आरोप केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, प्रशासनाला १० दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी

या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे यांची भेट घेऊन सर्वंकष चौकशीची मागणी केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. घनकचरा, पर्यावरण आणि इतर संबंधित विभागांतील जबाबदार अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. तसेच, संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी आरोप केला की, मोशी दुर्घटनेतील संबंधित कंत्राटदाराला आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांना स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्याकडून राजकीय संरक्षण दिले जात असून, त्यांच्याच वरदहस्तामुळे प्रशासकीय पातळीवर कठोर कारवाई टाळली जात आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव न आणता निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

मृतांच्या वारसांसाठी भरीव मदतीची मागणी

मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

 संबंधित ठेकेदाराने मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी.

 मृतांच्या कुटुंबातील सदस्याला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.

 राहण्यासाठी घर आणि त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी.

बचावकार्यातील विलंबावर प्रश्नचिन्ह

दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्यात झालेल्या विलंबावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले, “कुदळवाडीतील कारवाईसाठी शेकडो जेसीबी आणि यंत्रसामग्री तत्पर असते, मग मोशीतील कचऱ्याचा ढिगारा हटवण्यासाठी महापालिकेडे आवश्यक यंत्रसामग्री का नव्हती? पुण्यातून यंत्रसामग्री मागवावी लागल्यामुळे तब्बल ३६ तासांचा विलंब झाला. ही यंत्रसामग्री वेळेत मिळाली असती, तर काही निष्पाप नागरिकांचे प्राण वाचू शकले असते.”

तसेच, मोशी कचरा डेपोमधून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित दूषित पाण्यामुळे परिसरातील शेती व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही यंत्रणेवर ताशेरे

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी सुमारे ६० ते ७० टक्के कॅमेरे बंद असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे. त्यामुळे संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणेचे स्वतंत्र ऑडिट करून बंद कॅमेरे तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेला या सर्व मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी १० दिवसांचा अवधी देण्यात येत असून, या मुदतीत न्याय न मिळाल्यास पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने महापालिकेविरोधात तीव्र ‘ताला ठोको’आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

या पत्रकार परिषदेस प्रदेश प्रवक्ते सुनील माने, रविकांत वरपे, विशाल वाकडकर, ज्योती निंबाळकर, देवेंद्र तायडे यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*(टीप: या सर्व गंभीर आरोपांवर आमदार महेश लांडगे किंवा संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button