सफाई कामगारांच्या श्रमांचा सन्मान करणाऱ्या ‘अवकारिका’ चित्रपटाच्या हिंदी ट्रेलर व पोस्टरचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते अनावरण
स्वच्छता ही केवळ सफाई कामगारांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी” – महापौर रवि लांडगे


पिंपरी, १३ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचे कष्ट, त्यांचे शहरवासीयांप्रती असलेले अमूल्य योगदान आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची असलेली जबाबदारी अधोरेखित करणाऱ्या ‘अवकारिका’ या सामाजिक आशयाच्या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलर व पोस्टरचे अनावरण महापौर रवि लांडगे यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले. स्वच्छ भारत मिशनच्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटाच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या कष्टाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे.
शहर स्वच्छ दिसावे, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि सार्वजनिक परिसर सुंदर राहावा, यासाठी सफाई कामगार दररोज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतात. मात्र, त्यांच्या या अदृश्य श्रमांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. या श्रमांना समाजासमोर आणून सफाई कामगारांप्रती आदराची भावना निर्माण करण्यासोबतच ‘स्वच्छता ही केवळ त्यांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे’, हा विचार रुजविण्याचा महत्त्वाचा प्रयत्न ‘अवकारिका’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
या अनावरण सोहळ्यास नगरसदस्या सारिका मासुळकर, अभिनेता रोहित पवार, दिग्दर्शक सीए अरविंद भोसले, निर्माते भरत टिळेकर व अरुण जाधव यांच्यासह चित्रपटाशी संबंधित प्रमुख कलाकार, तंत्रज्ञ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विषयाला मनोरंजन आणि कलात्मक अभिव्यक्तीची जोड देत नागरिकांच्या मनाला स्पर्श करणारा संदेश यातून मांडण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ‘अवकारिका’ची टीम केवळ पडद्यावर स्वच्छतेचा संदेश देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. दिग्दर्शक सीए अरविंद भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजमेरा येथील एका उद्यानाची स्वच्छता आणि सुशोभीकरण करून त्याचा प्रत्यक्ष कायापालट केला आहे. नागरिकांच्या सहभागातून हे उद्यान आज स्वच्छता, खेळ, व्यायाम आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे चित्रपटातून मांडलेला विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा एक आदर्श वस्तुपाठ या टीमने समाजासमोर ठेवला आहे.
याप्रसंगी बोलताना महापौर रवि लांडगे यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि सफाई कामगारांच्या योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले,
“आपण सकाळी घराबाहेर पडतो, तेव्हा आपल्याला स्वच्छ रस्ते आणि परिसर दिसतो; मात्र त्यामागे अनेक सफाई कामगारांचे अथक परिश्रम असतात. त्यांच्या श्रमांचा सन्मान करणे म्हणजे केवळ कौतुक नव्हे, तर आपण स्वतः कचरा न करणे आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणे होय. ‘अवकारिका’ हा केवळ चित्रपट नसून नागरिकांच्या विचारांना सकारात्मक दिशा देणारा सामाजिक संदेश आहे.”
शहराची स्वच्छता ही केवळ महानगरपालिका प्रशासन किंवा सफाई कामगारांचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपल्या घरापासून, सोसायटीपासून आणि सार्वजनिक ठिकाणांपासून स्वच्छतेची सुरुवात केली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमांना सहकार्य करणे या छोट्या कृतींतून मोठा बदल घडू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
“माझे शहर स्वच्छ ठेवणे ही माझीही जबाबदारी आहे,” ही भावना प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराच्या मनात निर्माण झाली, तर ही मोहीम खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक स्वच्छ, सुंदर आणि हरित पिंपरी-चिंचवड घडवण्यासाठी नागरिकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.




