पिंपरी चिंचवड

संगीत क्षेत्रातील मानाचा २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते २९ ऑगस्ट रोजी चिंचवडमध्ये होणार भव्य पुरस्कार वितरण; ‘आशा से श्रेया तक’ सांगीतिक मैफलीचेही आयोजन

Spread the love

पिंपरी (लोकजागृती )अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकार व संगीतकारांना प्रदान केला जाणारा यंदाचा २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर करण्यात आला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी बुधवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा आगामी शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पार पडणार आहे. हा सोहळा सर्व संगीतप्रेमी व नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.

या कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, मनपा आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह कला व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

‘आशा भोसले पुरस्कारा’चे स्वरूप १,११,००० रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे. यामध्ये गानसम्राज्ञी आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेस नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सहकार्य संतोष रासने, गौरी लोंढे, सह कोषाध्यक्ष संतोष शिंदे, तसेच सुदाम परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सन २००२ पासून सुरू झालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराची एक गौरवशाली परंपरा राहिली आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, दिलीप काटकर, राजेशकुमार साकला आणि भाऊसाहेब भोईर यांचा समावेश असलेली स्वतंत्र निवड समिती कार्यरत होती. यापूर्वी हा बहुमान गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान (शांतनू मुखर्जी) यांसारख्या संगीत विश्वातील दिग्गजांना मिळाला आहे.

भारतीय संगीत विश्वात आपल्या सुमधुर आवाजाने स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या **श्रेया घोषाल** (जन्म: १२ मार्च १९८४) यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. कोटा येथे पं. महेशचंद्र शर्मा आणि मुंबईत मुक्ता भिडे यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी झी टीव्हीवरील ‘सारेगामापा’ (चिल्ड्रेन स्पेशल) चे विजेतेपद पटकावले.

‘देवदास’ (२००२) चित्रपटातील ‘बैरी पिया’ आणि ‘डोला रे’ या गाण्यांनी त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीची यशस्वी सुरुवात झाली. हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, आसामी, भोजपुरी आणि पंजाबी अशा २० हून अधिक भाषांमध्ये त्यांनी हजारो अजरामर गाणी गायली आहेत. ‘जादू है नशा है’, ‘बरसो रे’, ‘तेरी ओर’, ‘ये इश्क हाय’, ‘दीवानी मस्तानी’ तसेच मराठीतील ‘जीव दंगला’ व ‘मेरे ढोलना’ ही त्यांची गाणी प्रचंड गाजली.

* ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (‘देवदास’, ‘पहेली’, ‘जब वी मेट’, ‘जोगवा’ इत्यादी)

* ७ फिल्मफेअर पुरस्कार (आरडी बर्मन न्यू म्युझिक टॅलेंट अवॉर्डसह)

* १० हून अधिक फिल्मफेअर साऊथ पुरस्कार

* अमेरिकेतील ओहायो राज तर्फे २६ जून हा दिवस “श्रेया घोषाल डे” म्हणून घोषित.

* लंडन येथील युनायटेड किंगडमच्या संसदेत भारतीय संगीतातील योगदानासाठी विशेष सन्मान.

* ‘फोर्ब्स सेलिब्रिटी १००’ यादीत अनेकदा समावेश.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button