पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करावेत – उपमहापौर शर्मिला बाबर
ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीची घेतली दखल; अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडून प्रशासनाला तत्काळ निर्देश


पिंपरी, ७ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणारे शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करावेत, या प्रमुख मागणीसाठी शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने उपमहापौर शर्मिलाताई बाबरयांची भेट घेतली. नागरिकांच्या या समस्येची गंभीर दखल घेत उपमहापौर बाबर यांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन थेट अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांची भेट घेतली आणि जलतरण तलाव पूर्ववत सुरू करण्याबाबतचे निवेदन देत सविस्तर चर्चा केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहरातील सर्व जलतरण तलाव मागील काही काळापासून बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, नियमित जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. जलतरण हा आरोग्यासाठी आणि व्यायामाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याने, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकडून तलाव लवकरात लवकर सुरू करण्याची जोरदार मागणी होत होती.
सद्यस्थितीत पवना धरण १०० टक्के भरले असून पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे. त्यामुळे जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी आग्रही सूचना उपमहापौर शर्मिला बाबर यांनी प्रशासनाला केली.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केलेल्या सूचनेची अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी त्वरित दखल घेतली. त्यांनी तत्काळ उपायुक्त पंकज पाटील यांना शहरातील बंद असलेले सर्व जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. प्रशासनाने दाखवलेल्या या सकारात्मक भूमिकेमुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक, जलतरणपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलतरण तलाव सुरू करण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक आणि प्रशासकीय कार्यवाही वेगाने पूर्ण करून ही सुविधा लवकरात लवकर नागरिकांच्या सेवाभावी वापरासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर आणि अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह उपायुक्त पंकज पाटील, तसेच ज्येष्ठ नागरिक कैलास तापकीर, डॉ. चंद्रकांत चौधरी, शिवाजी आढाव, प्रमोद शहाणे, राजेंद्र पोतदार, अनिल पवार आणि मापारी शांतीलाल आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




