दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – यशवंतभाऊ भोसले यांचा इशारा
मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'ही नैसर्गिक नाही, प्रशासनाचा हलगर्जीपणा


पिंपरी, ११ जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगारांना श्रद्धांजली अर्पण करताना, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आणि कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. ही दुर्घटना नसून प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे झालेली ‘हत्या’ असल्याचा गंभीर आरोप करत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत कामगारांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना भोसले म्हणाले, “महापालिकेकडे आपत्कालीन परिस्थितीत राबवण्यासाठी ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ची यंत्रणा असणे अपेक्षित आहे, परंतु प्रत्यक्षात येथे फक्त ‘सेटिंग मॅनेजमेंट’ सुरू आहे.” एका मजल्याची परवानगी असताना दोन मजली इमारत उभी राहिली आणि तिथे कामगारांना धोकादायक स्थितीत कामावर ठेवले गेले, हे प्रशासनाचे मोठे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले. कचरा प्रकल्पातील अत्याधुनिक यंत्रसामग्री तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे धूळ खात पडून आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दुर्घटनेस जबाबदार असणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी.
प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने ‘विशेष तपास पथक’ (SIT) मृत कामगारांच्या कुटुंबांना केवळ आर्थिक मदत देऊन चालणार नाही, तर त्यांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी दिली जावी.
कंत्राटी पद्धत बंद करा:कचरा संकलन आणि स्वच्छतेसारखी कायमस्वरूपी कामे कंत्राटी पद्धतीने न करता, कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे.
कंत्राटी कामगारांच्या शोषणाबाबत बोलताना भोसले यांनी स्पष्ट केले की, हजारो कामगारांच्या वतीने ‘समान काम, समान वेतन’ आणि कायमस्वरूपी सेवेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. “आम्ही येत्या १५ दिवसांत आयुक्तांनी कामगार संघटनांसोबत बैठक घ्यावी, अशी अपेक्षा करतो. जर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर हजारो कामगार आपल्या कचरा वाहनांसह महापालिकेवर धडकतील आणि तीव्र आंदोलन पुकारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
मोशी दुर्घटनेमुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कामगार नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.




