मोशी दुर्घटनेवरून प्रशासनाला खडे बोल; प्रभाग १९ मधील समस्यांबाबत जनआंदोलनाचा इशारा : विजय उर्फ शितल शिंदे
शहराला 'मलिदा' कमावण्याचे साधन समजणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुखवटा फाडला; ज्येष्ठ नगरसेवक विजय शिंदे आक्रमक

पिंपरी, १७ जुलै २०२६ (लोकजागृती न्यूज):
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा कणा असणारी महानगरपालिका आज काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे बदनाम होत आहे. अधिकारी शहराला आपले घर न समजता केवळ मलिदा मिळवण्याचे सोयीस्कर साधन समजत आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.मोशी येथे घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेचा उल्लेख करत शिंदे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश केला. “कचरा डेपो व्यवस्थापनातील त्रुटी आणि सुरक्षेच्या नियमांची केलेली पायमल्ली ही प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची पराकाष्ठा आहे,” असे म्हणत त्यांनी या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. केवळ नोटिसा बजावून वेळ मारून नेणाऱ्या प्रशासनाला त्यांनी यावेळी धारेवर धरले.आपल्या प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांच्या समस्या मांडताना विजय शिंदे यांनी बिल्डर आणि महापालिका प्रशासन यांच्यातील ‘अर्थपूर्ण’ साटेलोट्याकडे लक्ष वेधले. शिंदे म्हणाले, “नैसर्गिक नाले बुजवून त्यावर बिल्डरांनी मोठमोठे प्रकल्प उभे केले आहेत. आज केवळ तीन दिवसांच्या पावसात नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. हे पाणी नैसर्गिक नाल्यांच्या अडथळ्यामुळे साचत आहे, हे उघड असतानाही प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गप्प का?”
नाल्यांचा प्रश्न गंभीर झाला असून, आरोग्याच्या समस्या आणि मालमत्तेचे होणारे नुकसान याला थेट प्रशासनच जबाबदार असल्याचे त्यांनी सभागृहात ठासून सांगितले.
नगरसेवक विजय शिंदे यांनी यावेळी आयुक्त आणि महापौरांना थेट इशारा दिला आहे. “बांधकाम परवानगी, नाले व्यवस्थापन आणि आरोग्य यासारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही, तर मला नाईलाजाने रस्त्यावर उतरून जनआंदोलन छडावे लागेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. आपल्या प्रभागातील जनतेच्या कष्टाच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये होणारा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
विजय शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. केवळ राजकारण न करता, सामान्यांच्या हक्कासाठी आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी सभागृहात आवाज उठवणारा नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा उंचावली आहे. प्रशासनाला थेट आव्हान देण्याच्या त्यांच्या या धडाडीमुळे, शहरातील अनधिकृत बांधकाम आणि भ्रष्ट कारभाराला चाप बसेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.आता या खणखणीत इशाऱ्यानंतर प्रशासन काय भूमिका घेते आणि प्रभाग १९ मधील नाल्यांच्या समस्येवर काय तोडगा काढता येईल,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




