८० व्या स्वातंत्र्यदिन निमित्त महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मुख्यालयात ध्वजारोह
स्वागतम ई-प्रवेश’ प्रणाली व सीएसआर पोर्टलचे लोकार्पण; विकसित, सक्षम आणि नागरिकाभिमुख पिंपरी-चिंचवड घडविण्याचा निर्धार


पिंपरी-चिंचवड, १५ ऑगस्ट २०२६ (लोकजागृती न्यूज):
“स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपल्याला मिळालेला अधिकार नसून, राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली एक मोठी जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करताना प्रत्येक नागरिकाला दर्जेदार मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुलभ सेवा देणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. स्वातंत्र्याची मूल्ये जपत लोककल्याण, पर्यावरण संवर्धन, महिला सन्मान आणि सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेऊन पिंपरी-चिंचवडला देशातील आदर्श शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा ठाम निर्धार पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगेयांनी व्यक्त केला.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर रवि लांडगे यांच्या प्रमुख हस्ते अत्यंत उत्साही आणि देशभक्तिमय वातावरणात राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांच्या बलिदान, समर्पण व त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
या राष्ट्रीय सोहळ्यास आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल, कला, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, ‘ल’ प्रभाग अध्यक्ष रेखा देवकर, नगरसदस्य मधुरा शिंदे, वर्षा जगताप यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, सहआयुक्त मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, वेंकटेश दुर्वास, ममता शिंदे, चेतना केरूरे, सहशहर अभियंता मनोज सेठीया, अजय सुर्यवंशी, प्रेरणा सिनकर यांसह विविध विभागप्रमुख, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा अधिकारी, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले
महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागणूक देण्याची शपथ घेण्यात आली. महिलांसाठी सुरक्षित व सन्मानजनक कार्यस्थळ निर्माण करणे, तसेच पोश (POSH) कायदा, पोश धोरण आणि शी-बॉक्स (SHe-Box) पोर्टलबाबत व्यापक जनजागृती करण्याचा दृढ निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती असल्याचे अधोरेखित करत पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्याची शपथ घेण्यात आली.
शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महापालिकेने नागरिकाभिमुख आणि डिजिटल प्रशासनाच्या दिशेने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ (क्षेत्रीय कार्यालय प्रवेश प्रणाली) या नवीन सेवेचा ऑनलाइन शुभारंभ तसेच ‘CSR पोर्टल’चे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक सुविधांमुळे नागरिकांना महापालिकेच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
याविषयी बोलताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “महापालिका भवनात नागरिकांच्या प्रवेशासाठी ‘ई-स्वागतम’ पास प्रणाली १ मेपासून यशस्वीरीत्या सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आज महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयात प्रवेश मिळणे सुलभ व पारदर्शक होणार असून, नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाचण्यासोबतच कार्यालयीन कामकाज अधिक सुव्यवस्थित होईल.”
स्वातंत्र्याच्या मूल्यांचे जतन करत विकासाची नवी दिशा, लोककल्याणाचा ध्यास, पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि पारदर्शक प्रशासनाची बांधिलकी यांचा समन्वय साधत पिंपरी-चिंचवडला अधिक सुंदर, सुरक्षित आणि विकसित शहर बनविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.




