पिंपरी चिंचवड

भाजपचा सांगवी पोलिसांवर दबाव;सत्ताधारी विरुद्ध सत्य असा संघर्ष या शहरात सुरू- शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे

Spread the love

 

चिंचवड/सांगवी (प्रतिनिधी) दिनांक २९ ऑक्टोबर २०२६लोकजागृती :सांगवी येथील संविधान चौकातील संविधान शिल्प आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची बेकायदेशीररीत्या तोडफोड करून हटविल्याप्रकरणी काँग्रेस आणि समविचारी संघटनांचे ठिय्या आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच आहे. या घटनेला १५ दिवस उलटूनही संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यावर भारतीय जनता पार्टीचा दबाव असल्याचे दिसून येते त्यामुळे शहरात आता सत्ताधारी विरुद्ध सत्य असा संघर्ष सुरू झाला आहे असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केले. त्यांनी पोलीस प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. संविधानाच्या सर्वोच्च दस्तऐवजाचा सन्मान आणि संविधान शिल्पाच्या पुनर्स्थापनेसाठी सुरू असलेला हा लढा थांबणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बनसोडे म्हणाले की,सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाची प्रास्ताविका आणि स्मारक बिनपरवाना, बेकायदेशीररीत्या हटविण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने हे स्मारक उद्ध्वस्त करण्यात आले.या घटनेला आज १५ दिवस झाले असून, आंदोलनाचा आठवा दिवस सुरू आहे. मात्र, उपलब्ध कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन अद्याप असमर्थ ठरल्याचे दिसत आहे.देशाच्या सर्वोच्च दस्तऐवजाचा भाग असलेल्या संविधानाच्या प्रास्ताविकेची बेशरमपणे तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल, तर त्यांना संविधानद्रोह आणि जनद्रोह करण्यासाठी खुली सूट दिली आहे का? भारतीय जनता पक्षासाठी देशात वेगळी न्यायसंहिता आहे का? संबंधितांवर कारवाई का केली जात नाही?

गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला जात आहे. मात्र, आयुक्तांकडून भेटीसाठी वेळ दिला जात नाही.आमच्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत.संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था आणि त्याच संविधानाच्या प्रास्ताविकेवर हल्ला करणाऱ्यांना ही व्यवस्था का रोखू शकत नाही? कारण या घटनेमागे मनुवाद आणि ठराविक वर्चस्ववाद आहे. परंतु सांगवीकर आणि स्थानिक रहिवासी आमच्या सोबत आहे याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी.

सांगवी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकही पूर्णाकृती पुतळा नसल्याचे सांगत, या परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, तसेच पीडब्ल्यूडी कॉटर्सच्या भिंतीची उंची वाढवून त्या ठिकाणी संविधान सृष्टी निर्माण करण्यात यावी.आजच्या युवा पिढीला आणि नागरिकांना संविधानिक मूल्यांचे महत्त्व समजले पाहिजे. आपली जीवनशैली कोणत्या मानवी मूल्यांवर आधारित आहे, याची जाणीव समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शहरात अधिकाधिक संविधान सृष्टींची निर्मिती होणे गरजेचे आहे.प्रत्येक प्रभागात एक संविधान सृष्टी निर्माण करण्याची आवश्यकता आहे.देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीच्या स्तंभांवर नियोजनबद्ध पद्धतीने नरेंद्र मोदी, अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या वतीने हल्ले केले जात आहेत.सत्तेच्या माध्यमातून सत्यावर हल्ला होत असेल, तर संविधानाच्या माध्यमातून त्या सत्तेला आव्हान देणे गरजेचे आहे.मानवतेसाठी योगदान दिलेल्या थोर महापुरुषांच्या विचारांच्या बाजूने समाजाने उभे राहण्याची वेळ आहे.दिल्लीमध्ये एक तारखेपासून संविधान बचावासाठी मोठे आंदोलन सुरू होणार असून पिंपरी-चिंचवडमध्येही संविधान बचावाचा लढा आधीच सुरू आहे.

 

सध्या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून सुरू असलेला हा लढा आगामी काळात महामोर्चा, पत्रकार परिषद आणि विविध आंदोलनात्मक मार्गांनी पुढे नेण्यात येणार आहे. योग्य वेळी पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाईल.देशाचा नागरिक दिल्लीमध्ये जाऊन संविधानाच्या मुद्द्यावर लढत असेल, तर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक शहरातच संविधान बचावासाठी लढतील. भारतीय जनता पक्षाच्या अन्यायकारी धोरणांविरोधात आणि संविधानाच्या सन्मानासाठी हा संघर्ष सुरूच राहील.या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील सर्व सामाजिक संघटना, पुरोगामी संघटना, राजकीय पक्ष, संविधानप्रेमी नागरिक, बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचे आवाहन नरेंद्र बनसोडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button