पिंपरी चिंचवड

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे “विनम्र अभियान पदयात्रा

Spread the love

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)  लोक जागृती दि.२८ ऑक्टोबर २०२६:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्व विभागात काम करत असलेल्या कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिवारात दिवाळी साजरी करण्याकरता दिनांक 3 नोव्हेंबर 2026 पूर्वी बोनस कायद्यानुसार सन 2025-2026 या वर्षाचा बोनस व ऑक्टोबर 2026 या महिन्यातील वेतन देण्यात यावे या मागणीसाठी उद्या गुरुवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशी “विनम्र अभियान पदयात्रा” राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने काढण्यात येणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्व विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना उदाहरणार्थ आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी वाहन चालक वैद्यकीय मधील स्वच्छता सेवक,वार्ड बॉय,नर्सेस, तांत्रिक कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी उद्यान विभाग मधील कर्मचारी, अग्निशमन विभागातील वाहनचालक व अग्निशमन कर्मचारी, पालिकेच्या सर्व शाळांमधील स्वच्छता सेवक शिपाई व इतर कर्मचारी, स्मशानामधील सर्व कर्मचारी, पाणीपुरवठा व जलवाहिनी विभाग मधील सर्व कर्मचारी सर्व प्रभागांमध्ये काम करणारे कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या सुमारे 4500 कर्मचाऱ्यांच्या समान काम समान वेतन,महापालिकेने रक्कम रुपये पाच लाखापर्यंतचा परिवारासह विमा उतरवणे,कर्मचाऱ्याचा अपघाती अथवा आजारी पडून मृत्यू झाल्यास वारसदारास रक्कम रुपये 25 लाख भरपाई पोटी देण्यात यावेत,अनुकंपा तत्वावर वारसदार यासमहापालिकेत नोकरी देण्यात यावी या कायदेशीर मागण्यांना मान्यता द्यावी.याकरता राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी चौकातील पुतळ्याला हार घालून दुपारी 3.30 वाजता महापालिकेच्या मुख्य इमारतीकडे सर्व कर्मचारी मा महापौर रवीजी लांडगे साहेब, माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्याकरता जाणार आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी मा उपकामगार आयुक्त श्री अभय गीते साहेब यांचे समोर वरील प्रश्नाबाबत पुणे येथे बैठक झालेली होती. सदर बैठकीस महापालिकेचे कामगार अधिकारी श्री प्रमोद जगताप हे उपस्थित होते. श्री जगताप यांना दिलेल्या निवेदनानुसार सर्व कंत्राटी पद्धतीवर दाखवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना बोनस कायद्यानुसार त्वरित बोनस देण्याबाबतचे आदेश संबंधितांना काढावेत अशी सूचना श्री गीते साहेब यांनी दिलेली होती.परंतु अद्याप सूचना किंवा आदेश काढण्याचे पत्र आम्हाला मिळाले नाही अथवा संबंधित कंत्राटदारांना त्यांनी दिलेले आहे किंवा कसे हे समजले नाही.परंतु बोनस कायद्यानुसार बोनस व वेतन कंत्राटदाराने न दिल्यास मुख्य मालक (प्रिन्सिपल एम्प्लॉयर) म्हणून बोनस व वेतन ही देण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची आहे.तसेच मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त महोदयांना आलेले आहेत. तरी आपल्या अधिकाराचा वापर करून महापालिकेने 3 नोव्हेंबर पूर्वी बोनस व ऑक्टोबर महिन्याचे वेतन या कर्मचाऱ्यांना द्यावे.

अनेक कंत्राटदार हे आम्ही वेतनामध्ये दर महिन्याला बोनस देतो अशी खोटी बतावणी करून कर्मचाऱ्यांचा कायदेशीर बोनस वर्षांवर्षें देत नाहीत तरी अशा कंत्राटदारांना आपण बोनस देण्याबाबतचे आदेश करावेत असेही उप कामगार आयुक्त यांनी महापालिकेच्या कामगार अधिकारी श्री जगताप यांना निर्देश दिलेले आहेत. पिंपरी चिंचवड शहराची निगा राखणाऱ्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या व सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त  केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button