पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात ‘जयंती २’ चित्रपटाच्या टीमचा धडाकेबाज वावर; तरुणाईचा अभूतपूर्व उत्साह!
कलाकारांच्या उपस्थितीत रंगला संवाद आणि गाण्यांवर ठेका; डिजेमुक्त गणेशोत्सव आणि व्यसनमुक्तीचा दिला संदेश

पिंपरी-चिंचवड (लोकजागृती न्यूज):
शहरातील तरुणाईमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या आगामी’ जयंती २’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आणि टीमने पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात जोरदार एन्ट्री केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शिट्ट्या, ताल्या आणि जल्लोषाने संपूर्ण कॉलेज परिसर पूर्णपणे दुमदुमून गेला होता.
कलाकारांची उपस्थिती व विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा होता.चित्रपटाच्या प्रचारार्थ आयोजित या विशेष कार्यक्रमास चित्रपटाचे प्रमुख कलाकार ऋतुराज वानखेडे ,पायल जाधव,मानसी सुभाष आणि राजकुमार जरांगे यांच्यासह संगीतकार आणि इतर तंत्रज्ञ उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य भोसले सर यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे स्वागत केले. या सोहळ्यात रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, कन्या शाळा आणि नवमहाराष्ट्र कॉलेजसह विविध ठिकाणचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाण्यांवर ठेका आणि सेल्फीचा क्रेझ विद्यार्थ्यांमध्ये होते.कार्यक्रमादरम्यान चित्रपटातील गाजत असलेल्या गाण्यावर अभिनेते ऋतुराज वानखेडे आणि विद्यार्थ्यांनी स्टेजवर एकच ठेका धरला. चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या मानसी सुभाष यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांमध्ये आपल्या लाडक्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी स्पर्धा लागली होती. विशेष म्हणजे, महाविद्यालयाचे प्राचार्य भोसले सर यांनीही कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत चित्रपटाचा मुख्य उद्देश आणि प्रवासातील अनुभव सांगितले. प्राध्यापकांनी व मान्यवरांनी कलाकारांचा विशेष सन्मान केला.
सामाजिक भान: डिजेमुक्त गणेशोत्सव आणि व्यसनमुक्तीचा संदेश केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, या प्रमोशन सोहळ्यातून कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शहराला एक महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला. आगामी गणेशोत्सवात नागरिकांनी ‘डिजेमुक्त गणेशोत्सव’ या संकल्पनेला पाठिंबा देऊन डिजे कमी आवाजात वाजवावा, असे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे, पोलीस प्रशासनाला साद देत अमली पदार्थांवर (ड्रग्ज) संपूर्ण बंदी घालण्यात यावी आणि युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, असा संदेशही या वेळी देण्यात आला.
कलाकारांच्या या ऊर्जावान सहभागामुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ‘जयंती २’ चित्रपटाविषयीची उत्सुकता शहरात आणखीनच वाढली आहे.




