पिंपरी चिंचवड

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न…

Spread the love

पिंपरी प्रतिनिधी (लोकजागृती ): संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘मोगरा फुलला’ हा भक्तिमय संगीत सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग, ओव्या, अध्यात्मिक विचार आणि भक्तिपरंपरेचा सुरेल जागर करण्यात आला. डॉ. गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे साहित्य, अध्यात्म आणि भक्तिपरंपरा यावर प्रभावी व्याख्यानातून मार्गदर्शन केले. प्रसिद्ध गायिका सौ. सन्मिता शिंदे यांच्या सुमधुर स्वरातून ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग व ओव्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण सभागृह भक्तिरसात चिंब भिजून गेले.

‘मोगरा फुलला’ या उपक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतमय साहित्याचा, त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा जागर करण्यात आला. ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग-ओव्यांमधील भक्ती, ज्ञान, अध्यात्म आणि मानवतावादी विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम ठरला.

या कार्यक्रमास नगरसेवक संदीप वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सदस्या सुलभाताई उबाळे, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, प्रियांका कुदळे, अरुणा लंगोटे, राजू बनसोडे, विराज लांडे, अनंत कोऱ्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रशेखर अहिरराव, जितेंद्र वाटकर, किरण शिंदे, गणेश मंजाळ, राघवेंद्र भांडगे आणि कैलास वाघेरे यांनी परिश्रम घेतले.

संत ज्ञानेश्वर माउलींच्या विचारांचा आणि भक्तिपरंपरेचा सुरेल आविष्कार घडविणारा ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारा ठरला. भक्तिमय वातावरण, दर्जेदार व्याख्यान आणि सुमधुर गायन यामुळे हा सोहळा उपस्थित रसिकांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button