पिंपरी चिंचवड

मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाच्या मागणीवरून डी.पी. सुनावणीत नाराजी*

नरेंद्र बनसोडेंनी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर घेतला आक्षेप; कब्रस्तानाची जागा डी.पी. प्लॅनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी

Spread the love

 

पिंपरी-चिंचवड : (लोकजागृती )चिखली-कुदळवाडी परिसरातील मुस्लिम समाजासाठी मंजूर असलेली कब्रस्तानाची जागा विकास आराखड्यात (डी.पी. प्लॅन) पूर्णपणे समाविष्ट करावी, अशी मागणी डी.पी. संदर्भातील सुनावणीदरम्यान नागरिकांनी केली. मात्र, या मागणीवर सुनावणीवेळी महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

*खासगी जागेचा पर्याय सुचविल्याने नाराजी*

सुनावणीदरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी उत्तरश्वर नामदेव लोंढे यांनी मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्ती, जमीनमालक अथवा अन्य व्यक्तींची खासगी जागा कब्रस्तानासाठी वापरण्याचा पर्याय सुचविल्याचे सांगण्यात येत आहे. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

कब्रस्तानासारख्या धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जबाबदारीने भूमिका मांडावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

*महापालिकेच्या जागेचा डी.पी. प्लॅनमध्ये समावेश करण्याची मागणी*

मुस्लिम समाजाकडून कोणत्याही व्यक्तीच्या खासगी मालमत्तेची मागणी करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या मालकीची आणि नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित असलेली कब्रस्तानाची जागा विकास आराखड्यात योग्य पद्धतीने समाविष्ट करावी, अशी मागणी असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर दफनभूमीसारख्या मूलभूत सुविधांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित जागेचा विकास आराखड्यात समावेश करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.

नरेंद्र बनसोडेंनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी ठाम भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नावर त्यांनी प्रशासनाला जाब विचारत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

कब्रस्तानाच्या जागेबाबतची मागणी आणि प्रशासनाची भूमिका यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. नागरिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणे आणि संवेदनशील विषयांवर सन्मानपूर्वक संवाद साधणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

*कब्रस्तानाच्या प्रश्नावर पुढील पाठपुराव्याची भूमिका

चिखली-कुदळवाडी परिसरातील कब्रस्तानाच्या जागेचा विकास आराखड्यात योग्य समावेश व्हावा, तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक गरजांचा विचार करून प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रश्नावर नरेंद्र बनसोडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कब्रस्तानाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणीही नागरिकांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button