महाराष्ट्र वूमन एक्सलन्स अवॉर्ड 2026 ने सायली संत सन्मानित


पुणे : (लोकजागृती )शिक्षण व कला सादरीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. सायली संत यांना *युनाय फाउंडेशन*च्या वतीने **“महाराष्ट्र वूमन एक्सलन्स अवॉर्ड 2026”** प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्यासह मायाश्री गायकवाड, बरका लाहोटी, शिल्पा खीवसरा, ॲड. आदिती निटुरे, रुक्मिणी गलांडे आणि शितल बिहारी या मान्यवरांची उपस्थिती होती.
हा सन्मान स्वीकारताना सायली संत यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “महाराष्ट्र वूमन एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याचा अभिमान आणि आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. कला सादरीकरण क्षेत्रातील माझ्या प्रयत्नांना मिळालेली ही मोठी दाद असून, यामुळे अधिक जोमाने आणि समर्पणाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “कला ही केवळ सादरीकरण नसून ती व्यक्त होण्याची ऊर्जा आहे. या प्रवासाची दखल घेऊन मला या पुरस्कारासाठी निवडल्याबद्दल मी निवड समितीची व युनाय फाउंडेशनची मनःपूर्वक आभारी आहे.”
सौ सायली संत या कला आणि शिक्षण क्षेत्रात समर्पितपणे कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, वर्कशॉप्स आणि संस्कार वर्ग आयोजित करतात. शालेय कार्यक्रम, नाट्यदिग्दर्शन, अँकरिंग आणि स्पर्धा मार्गदर्शनाद्वारे त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सर्जनशीलता विकसित करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत.
यापूर्वीही त्यांना महाराष्ट्रातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, हा सन्मान त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा देणारा ठरला आहे. पुढील काळातही शिक्षण व कलेच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी वेगळे आणि प्रेरणादायी सादर करण्याचा त्यांचा मानस आहे.




