पिंपरी चिंचवड

इंद्रायणी व पवना नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी ठोस पावले:मंत्री पंकजा मुंडे:

मंत्री पंकजा मुंड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Spread the love

 

पिंपरी-चिंचवड | दि. १० एप्रिल २०२६ :(लोकजागृती )पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणीय संवर्धन व शाश्वत विकासाच्या दृष्टीने पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये इंद्रायणी व पवना नद्यांची प्रत्यक्ष पाहणी तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या मुख्य प्रशासकीय इमारतीत विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

नदी पाहणीदरम्यान सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाणे, घनकचऱ्याची समस्या, तसेच नदीकाठ संवर्धनाची आवश्यकता यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी निदर्शनास आल्या. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आणि पर्यावरणपूरक विकासासाठी अनेक ठोस उपाययोजना सुचविल्या. यामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (STP) क्षमता वाढविणे, नाल्यांचे इंटरसेप्शन व डायव्हर्जन, नदीकाठ संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे यांचा समावेश होता.

यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुख्यालय आकुर्दी याठिकाणी आयोजित आढावा बैठकीत मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पर्यावरणीय संतुलन राखत विकासकामांना गती देण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.

यावेळी महापौर रवि लांडगे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौर कोट

“इंद्रायणी आणि पवना या नद्या शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या नद्यांचे प्रदूषणमुक्तीकरण हे शहराच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पिंपरी-चिंचवडला पर्यावरणपूरक आणि जलस्वयंपूर्ण शहर बनविण्याचा आमचा ठाम संकल्प आहे,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

इंद्रायणी व पवना नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी तसेच शहराच्या सर्वांगीण व पर्यावरणपूरक विकासासाठी ही पाहणी व आढावा बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामुळे भविष्यात ठोस आणि परिणामकारक निर्णयांना गती मिळणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button