अत्तर’ लघुपटाला सांस्कृतिक कलादर्पणमध्ये पाच नामांकने जाहीर
कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात ‘अत्तर’ लघुपट चर्चेत*


*राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गाजलेल्या ‘अत्तर’ची पुन्हा एकदा छाप*
(लोकजागृती )बहुचर्चित आणि जागतिक स्तरावर दखल घेतलेल्या ‘अत्तर’ या मराठी लघुपटाने पुन्हा एकदा आपली छाप पाडत २८ व्या सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात तब्बल पाच नामांकने पटकावली आहेत. या नामांकनांमुळे चित्रपटसृष्टीत ‘अत्तर’ची चर्चा अधिक रंगू लागली आहे.

या लघुपटाला उत्कृष्ट कथा (रामकुमार शेडगे), उत्कृष्ट बालकलाकार (मीरा शेडगे), उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (रेवा बर्गे), उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (विनय सोनवणे) आणि लक्षवेधी लघुपट अशा विविध प्रमुख विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. वेगवेगळ्या तांत्रिक आणि अभिनय क्षेत्रांमध्ये मिळालेल्या या नामांकनांमुळे ‘अत्तर’च्या गुणवत्तेची पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे.
‘अत्तर’ या लघुपटाची निर्मिती ‘द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स’ आणि ‘रुहाणी म्युझिक’ यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रामकुमार शेडगे यांनी केले असून त्यांच्या संवेदनशील आणि वास्तवदर्शी मांडणीमुळे हा लघुपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे.
या आधीही ‘अत्तर’ने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये या लघुपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे मराठी लघुपटसृष्टीला नवी उभारी मिळत असल्याचे चित्र दिसून येते.
दरम्यान, २८ वा सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार सोहळा येत्या २ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वाजता सुधागड एज्युकेशन सोसायटी, कळंबोली (मुंबई) येथे दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्याचे महत्त्वाचे आयोजक चंद्रशेखर सांडवे असून त्यांनी ही माहिती दिली. आता या सोहळ्यात ‘अत्तर’ लघुपटाला किती पुरस्कार मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




