पिंपरी चिंचवड

जल समृद्धी प्रकल्पांतर्गत खेड येथील सिमेंट बंधाऱ्यांचे लोकार्पण ग्रामस्थानी मानले आभार 

Spread the love

 

ता. १५ : (लोकजागृती )पुणे जिल्हातील खेड तालूक्यातील येथील विरहाम, गारगोटवाडी आणि कंदवाडी या गावांतील ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे ही समस्या अधिक तीव्र होत होती. या भागात चांगला पाऊस पडूनही पाणी साठवणुकीची योग्य सुविधा नसल्याने पाणी वाहून जात होते आणि उन्हाळ्यात टंचाई निर्माण होत होती.

ही समस्या लक्षात घेऊन जल समृद्धी प्रकल्पांतर्गत महिंद्रा अँड महिंद्रा लि. (इंजिन प्लांट, चाकण) आणि यश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विरहाम येथे ६० फूट, गारगोटवाडी येथे १०० फूट आणि कंदवाडी येथे ६० फूट लांबीचे असे तीन सिमेंट बंधारे नदी व ओढा पात्रात बांधण्यात आले आहेत.

या बंधाऱ्यांमुळे अंदाजे ३.१२ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून सुमारे १५५.७६ लाख लिटर भूजल पुनर्भरण होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ सुमारे ३,४५० ग्रामस्थांना होणार असून ८५ हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. तसेच ९५ शेतकऱ्यांना दुसरे पीक घेणे शक्य होईल आणि त्यांच्या उत्पन्नात सुमारे २० टक्के वाढ अपेक्षित आहे. या बंधाऱ्यांमुळे शेती, पिण्याचे पाणी तसेच पाळीव जनावरांसाठीही मोठा लाभ होणार आहे.

या सिमेंट बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा खेड तालूक्यातील विरहाम, गारगोटवाडी आणि कंदवाडी येथे पार पडला. यावेळी संजय क्षीरसागर (प्लांट हेड – महिंद्रा अँड महिंद्रा लि., चाकण), डॉ. चंचल मेडतीया, सौ. स्मिता पिल्ले व इतर महिंद्रा अधिकारी, तसेच श्री. रवींद्र पाटील (अध्यक्ष – यश फाऊंडेशन), ग्रामपंचायत प्रतिनिधी, सरपंच, ग्रामस्थ व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना संजय क्षीरसागर म्हणाले की, “महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सामाजिक बांधिलकी अंतर्गत ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असते. जल समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हे सिमेंट बंधारे गावातील जलव्यवस्थापनासाठी आदर्श ठरतील. यामुळे गावातील पाणी समस्या कमी होण्यास मदत होईल आणि शेतकरी, ग्रामस्थ तसेच पशुधन यांना निश्चितच लाभ मिळेल.”

या प्रकल्पाच्या कामात ग्रामस्थांनी श्रमदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भविष्यात पाण्याचा वापर अधिक जबाबदारीने व काटकसरीने करून जलसंपदा टिकवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत करत, “या बंधाऱ्यांमुळे भूजल पातळीत सुधारणा होऊन विहिरी व बोअरवेलमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे शेतीला मोठा आधार मिळून गावाच्या अर्थकारणाला चालना मिळेल,” अशी अपेक्षा ग्रामस्थानी व्यक्त केली. असे यश फाउंडेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील  यांनी माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button