पिंपरी चिंचवड

​पिंपरी-चिंचवडमधील महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित देखभाल व साफसफाई करा; विशाल जाधव यांची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी

Spread the love

पिंपरी (लोकजागृती )पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध भागांत उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची सध्या दुरवस्था झाली असून, त्यांची तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई आणि डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विशाल अनंतराव जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांना लेखी निवेदन दिले.

​शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांसह अनेक महापुरुषांचे भव्य पुतळे आहेत. हे पुतळे केवळ स्मारके नसून नागरिकांसाठी प्रेरणास्थाने आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या स्मारकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पुतळ्यांवर धूळ साचली असून पक्ष्यांच्या विष्ठेमुळे विद्रुपीकरण झाले आहे. तसेच स्मारकांच्या परिसरातील रंगकाम उडाले असून चबुतऱ्यांचीही पडझड झाली आहे, असे जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.

​यावेळी बोलताना विशाल जाधव म्हणाले की, “महापुरुषांच्या जयंती किंवा ठराविक दिवसांपुरतीच साफसफाई मर्यादित न ठेवता, ती नियमितपणे होणे आवश्यक आहे. देखभालीअभावी स्मारकांची अशी स्थिती होणे हे आपल्या शहराच्या वैभवाला साजेसे नाही. प्रशासनाने केवळ ‘एक वेळची मोहीम’ म्हणून याकडे न पाहता कायमस्वरूपी देखभाल वेळापत्रक (Maintenance Schedule) निश्चित करावे.”

​निवेदनातील प्रमुख मागण्या:

​शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने तातडीने साफसफाई व्हावी.

​पुतळे आणि चबुतऱ्यांची आवश्यक तिथे रंगरंगोटी व डागडुजी करण्यात यावी.

​स्मारकांच्या परिसरातील बंद अवस्थेत असलेले विद्युत दिवे (Focus Lights) दुरुस्त करून परिसर प्रकाशमान करावा.

​उद्याने आणि स्मारकांच्या देखभालीसाठी नियमित वेळापत्रक तयार करावे.

​या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून उद्यान विभाग आणि स्थापत्य विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंतीही जाधव यांनी यावेळी केली. या निवेदनामुळे आता प्रशासन पुतळ्यांच्या देखभालीबाबत काय पावले उचलणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सदर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांना देताना पत्रकार शहनाज कुरणे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button