पिंपरी चिंचवड

स्मार्ट सिटी संचालक मंडळातील नियुक्त्या पारदर्शक व्हाव्यात :नगरसेविका अनुराधा गोरखे:

नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला भूखंड उपलब्ध करून द्यावा – नगरसेविका अनुराधा गोरख

Spread the love

पिंपरी-चिंचवड | १३ मार्च २०२६ (लोकजागृती )आज झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिके च्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी शहराच्या प्रशासनाशी व विकासाशी संबंधित विविध महत्त्वाचे मुद्दे मांडत प्रशासनाकडे काही सूचना व प्रश्न उपस्थित केले.

सभेत बोलताना नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी नमूद केले की, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर नवीन सदस्यांची नियुक्ती करताना केवळ राजकीय सोयीचा विचार न करता सक्षम, अभ्यासू व विषयाची जाण असलेल्या लोकप्रतिनिधींना संधी देणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीचे प्रकल्प शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे अशा प्रकल्पांच्या अंमलबजावणीत गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नव्याने नियुक्त होणाऱ्या संचालकांना सुरू असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती देऊन आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली.

याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबतही त्यांनी काही मुद्दे सभागृहासमोर मांडले. महानगरपालिकेसाठी एकूण १० नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती अपेक्षित असताना सध्या केवळ ३ सदस्यांची नावे प्राप्त झाल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. उर्वरित ७ सदस्यांच्या नियुक्तीबाबत सध्याची स्थिती काय आहे, तसेच या प्रक्रियेत विलंब होण्यामागील कारणे कोणती आहेत, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सादर करण्यात आलेल्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केल्याची खात्री प्रशासनाने केली आहे का, याबाबतही त्यांनी विचारणा केली. उर्वरित जागा भरण्याबाबत प्रशासनाची पुढील कार्यवाही काय असेल व त्यासाठी किती कालावधी अपेक्षित आहे, याची माहिती सभागृहासमोर मांडण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याबाबतही महत्त्वाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. शहरातील तरुणांमध्ये क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची मोठी क्षमता असून त्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील उपलब्ध महानगरपालिका भूखंडांचा सर्वेक्षण करून भविष्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी योग्य जागा निश्चित करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक कार्यवाही करून शासनाकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहाकडे केली.

नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे शहराच्या विकासासोबत प्रशासनिक प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button