पिंपरी चिंचवड

प्रत्येक महिलेने दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवत छंद जोपासावेत – उपमहापौर शर्मिला बाबर

विविध कार्यक्रमांद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Spread the love

पिंपरी, दि. ९ मार्च २०२६ –* महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे आणि वैयक्तिक आयुष्याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कामाच्या धकाधकीत अनेकदा महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात, मात्र निरोगी शरीर आणि सकारात्मक मन असेल तरच त्या कुटुंब, समाज आणि कार्यस्थळी अधिक सक्षमपणे योगदान देऊ शकतात. त्यामुळे महिलांनी आपल्या दैनंदिन दिनक्रमात आरोग्याची काळजी घेणे, नियमित व्यायाम करणे आणि मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेने दिवसातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी राखून ठेवत आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवावा. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी ऊर्जा आणि सकारात्मकता मिळू शकेल, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मनोगत व्यक्त करताना उपमहापौर शर्मिला बाबर बोलत होत्या.

या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, पल्लवी वाल्हेकर,प्रियांका कुदळे यांच्यासह सहआयुक्त मनोज लोणकर, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपआयुक्त चेतना केरूरे, संदीप खोत, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका महिला अधिकारी,महिला कार्यकारी अभियंता तसेच कर्मचारी उपस्थित होत्या.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, महापालिकेत कार्यरत असलेल्या सर्व महिला कर्मचारी माझ्यासाठी भगिनींसारख्या आहेत. त्या विविध विभागांमध्ये जबाबदाऱ्या पार पाडत शहराच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कामाच्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील किंवा कोणत्याही बाबतीत सहकार्याची आवश्यकता भासत असेल, तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मदत करण्यासाठी मी व माझे सहकारी पदाधिकारी सदैव तत्पर आहोत. महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि सकारात्मक कार्यपरिसर मिळणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. महानगरपालिकेतील महिला कर्मचारीही आपल्या प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ कामामुळे शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करत सभापती बारणे यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिला सक्षमीकरण ही केवळ घोषणांपुरती मर्यादित राहू नये, तर त्यासाठी सातत्यपूर्ण उपक्रमांची गरज आहे. त्यामुळे पुढील वर्षी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे नियोजन आतापासूनच करण्याचा मानस आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच महिलांना विचार मांडता येतील, त्यांच्या समस्या आणि अनुभवांवर मोकळेपणाने चर्चा होईल, अशा विचारमंथनपर कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाईल. तसेच महिलांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे उपक्रम राबविण्यात येतील. महिलांसाठी समुपदेशन, व्यक्तिमत्व विकास, आरोग्य जागरूकता तसेच कार्यस्थळी येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येईल. पुढील महिला दिन अधिक अर्थपूर्ण आणि उपयुक्त ठरावा यासाठी आतापासूनच सविस्तर अहवाल तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम आखले जातील. महिलांना सक्षम, आत्मविश्वासू आणि समाजजीवनात अधिक सक्रिय बनविण्यासाठी महानगरपालिका स्तरावर सातत्याने सकारात्मक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राहील, असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले.

महिला दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात महापालिकेच्या कर्मचारी महिलांच्या गुणदर्शन कार्यक्रमाने करण्यात आली. यामध्ये कर्मचारी वर्गाने समुह नृत्य सादर केले. तर लकी ड्रॉ मध्ये पैठणीचे बक्षिस आणि सोलो डान्स देखील यावेळी महिलांनी सादर केला. याशिवाय, महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रात महापालिकेच्या महिलांसाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खोत यांनी तर सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार प्रमोद जगताप यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button